औरंगाबाद : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु झाले आहे. मात्र, हे उपोषण म्हणजे भाजपची 'नौटंकी' असल्याचा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला होता. जलील यांनी केलेल्या आरोपाला आता पंकजा मुंडेंनी उत्तर दिले आहे.
काही राजकीय नेत्यांना जनता मूर्ख असल्याचे वाटत आहे. त्याचाच भाग म्हणजे भाजप नेत्यांकडून आज औरंगाबादमध्ये होत असलेले उपोषण. सत्ता असताना मराठवाड्यातील पाणी प्रश्न सोडवला नाही, मात्र आता उपोषण करून 'नौटंकी' करण्याचे काम भाजप नेते करत असल्याचा आरोप जलील यांनी केला होता.
जलील यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्यात की, आम्ही सत्तेत असताना सुद्धा खूप कामे केली आहेत. तर आजचे उपोषण हे मराठवाड्याचा जनतेच्या पाणी प्रश्नासाठी आहे. त्यामुळे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी याचे स्वागत केले पाहिजे. स्वागत करत नसाल तर किमान टीका तरी करू नयेत असा टोला पंकजा मुंडे यांनी जलील यांना लगावला.
तर पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, मराठवाड्याचा प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र आले पाहिजे. आमच्या सरकारने कामे केलीच, मात्र या सरकारने सुद्धा तेवढ्याच जलदगतीने कामे करून मराठवाड्याचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावे या मागणीसाठी हे लाक्षणिक उपोषण असल्याचे सुद्धा पंकजा मुंडे म्हणाल्यात.