भाजपाने अजित पवारांना सोबत घेणं पटलं का? पंकजा मुंडे म्हणाल्या- "सध्या जे चाललंय ते..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 08:53 PM2023-10-17T20:53:09+5:302023-10-17T20:53:50+5:30

Pankaja Munde Exclusive: पंकजा मुंडेंनी भाजपाच्या राजकीय भूमिकेवर मांडलं सडेतोड मत

Pankaja Munde Exclusive Interview about BJP Ajit Pawar alliance in Maharashtra government | भाजपाने अजित पवारांना सोबत घेणं पटलं का? पंकजा मुंडे म्हणाल्या- "सध्या जे चाललंय ते..."

भाजपाने अजित पवारांना सोबत घेणं पटलं का? पंकजा मुंडे म्हणाल्या- "सध्या जे चाललंय ते..."

Pankaja Munde Exclusive, Ajit Pawar BJP alliance: महाराष्ट्रात २०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकांनंतर एक विचित्र गोष्ट घडली. भिन्न विचारधारांचे काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र आले आणि त्यांच्या महाविकास आघाडीने सत्तास्थापना केली. हे सरकार अडीच वर्षे टिकले. त्यानंतर २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा मोठा गट फोडला आणि भाजपासोबत जाऊन सत्तास्थापना केली. राज्यातील जनता या गोष्टी पचवेपर्यंतच अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांच्या विचारांशी फारकत घेत थेट सत्तेत उडी घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच अजित पवारांनाही उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले. इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदही देण्यात आले. अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपाचा डाव काहींना पटला तर काहींना रूचला नाही. याचबद्दल लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला. त्यावर मुंडे यांनी रोखठोक मत व्यक्त केले.

आशिष जाधव यांनी प्रश्न विचारला, "भाजपाने प्रचाराच्या वेळी सिंचन घोटाळा, राज्य सहकारी बँकेचा घोटाळा यासारख्या गोष्टींवर अजित पवार यांना टार्गेट केले होते. मग त्यांना सोबत घेताना भाजपाचा खरा मतदार दुरावेल असा विचार केला गेला नाही का? तुम्हाला हे पटलं का?" त्यांच्या प्रश्नाला पंकजा यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले.

"मतदारांचा विचार मी करते. पण मी अजित पवार या एका व्यक्तीबद्दल म्हणणार नाही. आम्ही त्यावेळी ज्या निवडणुका लढलो त्यात एका व्यक्तीला टार्गेट केलं नव्हतं, एका विषयाला टार्गेट करून लढत होतो. भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन करत होतो. सध्या जे चाललंय ते राजकारण आहे. आपली शक्ती वाढवणं हे प्रत्येक पक्षाचा राजकारणातला अधिकार आहे. सत्ता असेल तर लोकांची सेवा करता येते. त्यामुळे या गोष्टींच्या माध्यमातून स्थायी आणि स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न केला जात आहे," अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी अजितदादांना सोबत घेण्याच्या भाजपाच्या कृतीचे समर्थनच केले.

Web Title: Pankaja Munde Exclusive Interview about BJP Ajit Pawar alliance in Maharashtra government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.