मुंबई : नवरात्रीच्या निमित्ताने राज्यातील शक्तीपीठांना व प्रेरणा केंद्रांना अभिवादन करण्यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष माधवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली जागर आदिशक्तीचा- सन्मान नारीशक्तीचा ही २२०० किलोमीटरची यात्रा बुधवारपासून सुरू होत आहे. मात्र, या यात्रेत महिला व बालकल्याण मंत्री व भाजपा कोअर कमिटीच्या सदस्य पंकजा मुंडे यांना कुठेही स्थान देण्यात आलेले नाही.
नाशिकपासून सुरू होऊन ही यात्रा अहमदनगर, बुलडाणा, परभणी, माहूर (नांदेड), उस्मानाबाद, कोल्हापूर व सातारा अशी जाईल. भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे एक दिवस यात्रेत सहभागी होऊन मार्गदर्शन करणार आहेत तर परभणी येथील कार्यक्रमात प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुराणिक उपस्थित राहणार आहेत. शेतकरी महिला संमेलन, बचतगट मेळावा, आंगणवाडी सेविकांचा सन्मान, महिला कीर्तनकारांचा सत्कार, अनुसूचित जाती जमातींच्या महिलांसाठीच्या योजनांची माहिती देणारा मेळावा, महिला लोकप्रतिनिधी संमेलन, सैनिकांच्या विधवांचा सत्कार आणि विद्यार्थिनींचा मेळावा असे कार्यक्रम यात्रेत होतील, असे पक्षाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.