बीड: विधानसभा निवडणुकीत पराभव मिळाल्यापासून भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) राजकारणातून साइड लाईन झालेल्या पाहायला मिळत आहेत. यापूर्वी विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकीत त्यांचा अपेक्षाभंग झाला. पण, आता परत एकदा विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडेंच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. याबाबत स्वतः पंकजा यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
'संधी मिळाली तर...'आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोपीनाथ गडावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पुर्वी मीडियाशी संवाद साधताना पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेच्या उमेदवारीवर महत्वाचं वक्तव्य केलं आहे. "राजकारणात अनेकदा संधी येत-जात असतात. आमच्यावर गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. मला पदाची अपेक्षा नाही, पण संधी मिळाली तर सोनं करेन," असे सूचक वक्तव्य पंकजा यांनी केले आहे.
'ही तर लोकांची इच्छा'त्या पुढे म्हणाल्या की, "राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही. मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते. मला विधानपरिषदेची उमेदवारी मिळावी, ही लोकांची इच्छा आहे. लोकांची इच्छा हीच माझी शक्ती आहे. यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, ते पाहावं लागेल. घोडामैदान फार लांब नाही," असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.