मुंबई - भाजपाचे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या सध्या भाजपावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारी देण्यात न आल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनीही भाजपा तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक प्रतिक्रिया दिल्या होत्या. तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधातही तीव्र आंदोलन करत पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंकजा मुंडे नाराज आहेत का असा प्रश्न प्रसार माध्यमांनी विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंकजाताई भाजपाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशचा प्रभार आहे. त्या सातत्याने मध्य प्रदेशला जात असतात. तिथे आता निवडणुका आहेत. तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात असतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. भाजपा हा एक परिवार आहे आणि आम्ही सर्वजण या परिवाराचे घटक आहोत.
पंकजा मुंडे यांनी फडणवीस सरकारच्या काळात मंत्रिपद भुषवले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पंकजा मुंडेंचे चुलत भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. तेव्हापासून पंकजा मुंडे या भाजपाच्या राजकारणात काहीशा मुख्य प्रवाहाबाहेर गेल्या आहेत. या काळात पक्षाने त्यांना राष्ट्रीय राजकारणात स्थान दिले होते. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेची उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होता. मात्र पक्षाने त्यांचे अद्याप पुनर्वसन केलेले नाही.