ऑनलाइन लोकमतअहमदनगर (चौंडी), दि. 31- राज्य सरकार धनगर समाजाला सत्तेत न्याय मिळवून देईल. आरक्षणाच्या मुद्द्यावर समस्त धनगर समाज एकत्र राहील. अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी या त्यांच्या जन्मगावातच दरवर्षी साजरी होईल. विकासासाठी चौंडी गाव दत्तक घेतले आहे, अशी घोषणा ग्रामिणविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडी (ता. जामखेड) येथे मंगळवारी मेळावा झाला. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांनी मुंबई येथील आझाद मैदानावर मेळावा घेवून चौंडीकडे पाठ फिरविली. या पार्श्वभूमीवर चौंडी येथील मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. शेकापचे आमदार गणपतराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जयंती मेळाव्यास धनगर समाजातील सहा आमदारांसह विविध पक्षाचे ११ आमदार उपस्थित होते. राजस्थानच्या मुंख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे या मेळाव्याला येऊ शकल्या नाहीत. त्याऐवजी राजस्थानचे उद्योगमंत्री गजेंद्रसिंह यांनी या मेळाव्याला हजेरी लावली. या मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, राज्य सरकार धनगर समाजाला सत्तेत न्याय मिळवून देईल. राज्यसभेत भाजपनेच सर्वप्रथम धनगर समाजातील डॉ. विकास महात्मे यांना प्रतिनिधीत्त्व देण्याचा निर्णय घेतला आहे.चौंडी येथील विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही. हे गाव विकास करण्यासाठी दत्तक घेतले आहे. या मेळाव्याला विविध राजकीय पक्षांचे ११ आमदार उपस्थित होते. चौंडी ही धनगर समाजाची पंढरी आहे. त्यामुळे जयंती उत्सव चौंडीतच दरवर्षी साजरा होईल. धनगर समाजाचे नेतृत्त्व यापुढे राम शिंदे यांनीच करावे, असा असा आग्रह उपस्थित आमदारांनी त्यांच्या भाषणातून केला. तसेच जानकर यांनी मुंबई येथे स्वतंत्र मेळावा घेतला, त्यावर आमदारांनी जाहीरपणे नापसंती व्यक्त केली. ‘अहिल्यादेवी यांची सेवा केली तर संधी आपोआप मिळते. जे मला मिळाले, ते तुम्हालाही मिळेल’,असे राम शिंदे यांनी सांगत नाव न घेता महादेव जानकर यांना टोला लगावला. राम शिंदे यांनी या मेळाव्यात जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
धनगर समाजाला न्याय देणार- पंकजा मुंडे
By admin | Published: May 31, 2016 4:24 PM