Maharashtra Politics: भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. मध्यंतरी ठाकरे गटातील आमदाराने पंकजा मुंडे यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली होती. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या मुंबई दौऱ्यातही पंकजा मुंडे दिसल्या नाहीत. देवेंद्र फडणवीस जातात, त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे जात नसल्याची कुजबूज राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या सर्वांवर पंकजा मुंडे यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार प्रीतम मुंडे गेवराईत एकत्र आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाकडून असलेल्या ऑफरविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर, माझ्या मनात कोणतीही खदखद नाही. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे यांनी उत्तर दिले आहे. अध्यक्षांच्या उत्तराला मी परत ओव्हरटेक करत नाही. माझ्या प्रदेशाध्यक्षांनी उत्तर दिले हीच मोठी गोष्ट आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला का जात नाही?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमात असतात त्या कार्यक्रमात पंकजा मुंडे दिसत नाहीत, अशी चर्चा आहे. त्यामागचे कारण काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, मीही ती चर्चा ऐकली आहे. या मुद्द्यावर वेगळी पत्रकार परिषद घेईन, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्टपणे सांगितले. माझ्या मनात खदखद आहे, अशा बातम्या लावण्याचे कारण नाही. फडणवीस ज्या कार्यक्रमाला आले, त्या कार्यक्रमात मी अपेक्षित नव्हते. त्यामुळे मी आले नाही. मी भाजपच्या संस्कारात वाढलेली, मुशीत वाढलेली सच्ची कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी पक्षाचा प्रोटोकॉल पाळते, असे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या रक्तात भाजप आहे. या कपोलकल्पित बातम्या सोडून पंकजा यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करण्याचे काम काही लोक करत आहेत. पंकजा मुंडे आमच्या नेत्या आहेत. त्यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले आहे. आयुष्यात आणि स्वप्नातही भाजपला साईडला करावे किंवा आपण साईडला व्हावे असे त्यांच्या मनात येत नाही. त्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्रात मोठे वलय आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. त्यांना केंद्रीय पातळीवरील जबाबदारी आहे, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"