मुंबई: विधानसभा निवडणुकीपासून पक्षावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांचं भाजपाकडून राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता आहे. पंकजा यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांमध्ये याबद्दल एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजपासून भाजपाच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात पंकजा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकतं. एप्रिलमध्ये विधान परिषदेच्या आठ जागा रिक्त होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांकडून नावांची चाचपणी सुरू आहे. याशिवाय इच्छुकांचीदेखील मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपाकडे जास्त संख्याबळ असल्यानं त्यांना काही उमेदवारांना सहज विधान परिषदेवर पाठवता येतील. त्यामध्ये पंकजा यांचं आघाडीवर असल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीत बीडच्या परळी मतदारसंघात पंकजा यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांचे चुलत बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी त्यांना पराभूत करत विधानसभा गाठली. या निवडणुकीत स्वकियांनीच दगाफटका केल्याची भावना निर्माण झाल्यानं पंकजा पक्षावर नाराज आहेत. त्या पक्षांतर करणार असल्याची चर्चादेखील सुरू होती. पक्षातल्या इतर नाराज नेत्यांसोबत त्यांनी भगवानगडावर समर्थकांचा मेळावादेखील घेतला. त्यात त्यांनी पक्षाच्या कोअर कमिटीतून बाहेर पडत असल्याचं जाहीर केलं. त्यांच्या याच नाराजीची पक्षानं दखल घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग मराठवाड्यात आहे. ओबीसी समाजाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या त्या भाजपामधल्या महत्त्वाच्या नेत्या मानल्या जातात. अनेक वर्षे आमदार आणि पाच वर्ष मंत्री म्हणून काम केल्यानं त्यांच्याकडे संसदीय कामाचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या या अनुभवाचा पक्षाला विधान परिषदेत सत्ताधाऱ्यांना रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो, असं भाजपामधल्या नेत्यांना वाटतं.
आजच्या महत्त्वाच्या बातम्या
शिक्षकांसंदर्भात केलेल्या 'त्या' विधानावरून इंदुरीकर महाराज पुन्हा वादात...तर सर्वात आधी मीच डिटेन्शन सेंटरमध्ये जाईन- मुख्यमंत्रीCoronavirus: ज्या व्यक्तीमुळे पसरला कोरोना, तो अखेर सापडलाशांततेच्या मार्गानं सीएएला विरोध करणारे गद्दार, देशद्रोही होत नाहीत- हाय कोर्ट