मुंबई : माजी मंत्री व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी केलेली फेसबुक पोस्ट आणि सोमवारी ट्विटर अकाउंटवरून काढलेला भाजपचा उल्लेख व त्यांनतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी अनेक भाजप नेते सेनेत प्रवेश करण्याचे वक्तव्य करून त्यात घातलेले खतपाणी. यामुळे पंकजा मुंडे पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करणार या तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र ट्विटरवरून भाजप हा शब्द हटला असला तरी पंकजा यांच्या फेसबुक पेजवर कमळ दिसलं आहे.
राज्यातील सत्ता गमावल्यानंतर भाजपामधील अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंसह अनेक वरिष्ठ नेत्यांची तिकीटं कापण्यात आली होती. पंकजा मुंडेंना बीडच्या परळीमधून उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर त्या सक्रिय राजकारणापासून काहीशा दूर गेल्या आहेत. त्यांनी ट्विटरवरुन भाजपा नावाचा उल्लेखदेखील काढून टाकला आहे. त्यामुळे पंकजा मुंडे भाजपा सोडणार अशीही चर्चा सुरु होती.
मात्र पंकजा मुंडे भाजप सोडणार का ? या प्रश्नांना आता पूर्णविराम मिळाला आहे. कारण जरी ट्विटरवरून भाजप हा शब्द हटला असला तरी पंकजा यांच्या फेसबुकवर कमळ दिसलं आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरून एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टमध्ये असलेल्या फोटोवर कमळाचं चिन्ह डाव्या कोपऱ्यात दिसत आहे. या कमळ्याचं चिन्हावरून तरी आता पंकजा मुंडे पक्ष सोडून जाणार नाही, यावर शिक्कामोर्तब झाला असंच म्हणावं लागेल.
तर पंकजा मुंडे या भाजपाच्या नेत्या होत्या, आजही आहेत अन् उद्याही असतील, असे म्हणत पंकजा मुंडेंच्या शिवसेना प्रवेशाचे वृत्त चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावले होते. भाजपाच्या आजच्या स्थितीमध्ये गोपीनाथ मुंडेंचं मोठं योगदान आहे. पंकजा मुंडे या गोपीनाथ मुडेंनी उभारलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्या, नेत्या आहेत. त्यामुळे, भाजपा सोडून इतर कुठल्याही पक्षासोबत त्या जाणार नसल्याचं पाटील यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.