Pankaja Munde And Pritam Munde: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात हालचालींना वेग आल्याचे दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू आहे. जाहीर झालेले उमेदवार तसेच इच्छुक नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपानेपंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, पंकजा मुंडे यांची बहीण प्रीतम मुंडे यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. यानंतर आता प्रीतम मुंडेंनी शेवगाव-पाथर्डीतून निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. यावर पंकजा मुंडे यांनी सूचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीमधून विधानसभा लढवावी, अशी मागणी अनेकदा करण्यात आली होती. परंतु, भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली. आता प्रीतम मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभा लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
प्रीतम मुंडेंनी शेवगाव-पाथर्डीतून लढावे, निवडून आणू
भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी-शेवगाव मधून उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणू, असे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे यांना कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीविषयी प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितले की, आताच या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही. माझ्या शेजारी शेवगाव-पाथर्डीच्या आमदार बसलेल्या आहेत, त्यांचे टेन्शन वाढवण्याचे कारण नाही.
दरम्यान, प्रीतम मुंडे यांचे पुनर्वसन होणार का, यावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, पुनर्वसन हा विषय त्यांच्यासाठी असतो, जो एखाद्या गोष्टींने ग्रस्त असतो. परंतु, आम्ही कोणत्याही गोष्टीने ग्रस्त नाही.