Maratha Reservation: जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याबाबत शासन निर्णय जारी केला. जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची लेखी विनंती करण्यात आली आहे. मात्र, सरसकट सर्वांना असा उल्लेख नसल्याने मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला आहे. यातच राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी याबाबत पुन्हा एकदा भाष्य केले आहे.
मराठा आरक्षणाचा विषय सध्या महाराष्ट्रात सगळीकडे आहे. मुळात ओबीसीतून आरक्षणाची मराठा समाजाची मागणी नव्हती. त्यांची साधी, प्रामाणिक अशी मागणी होती की आम्हाला आरक्षण द्या. त्यांच्यातील जो समाज वंचित राहिलेला आहे, मुख्य प्रवाहातून बाहेर राहिला होता. त्याला आरक्षण देण्याविषयी सर्वांची मान्यता होता. अगदी गोपीनाथ मुंडे असल्यापासून ते आत्ताच्या सर्व नेत्यांची याला मान्यता आहे, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षणाला पाठिंबा, पण ओबीसीतून मिळणे शक्य नाही
पण आमची जी भूमिका आहे ती पहिल्यापासून स्पष्ट आहे. मराठा आरक्षणाला आमचे समर्थन आहे. पण असे कोण म्हटल की, मराठ्यांना ओबीसींमधून आरक्षण द्या? असे कोणी मगणी करणे आणि ते मिळणे शक्य नसते. संविधानिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी शक्य होत नाहीत. मराठा समाजाला खरे आरक्षण पाहिजे जे कोर्टात टिकेल ते दिले गेले पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.
दरम्यान, राजकारणातून काही काळ ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे शिवशक्ती परिक्रमा करत आहेत. मराठा आरक्षणासाठी जे तरुण आत्महत्या करताहेत त्यांच्याबाबत मला खूपच वाईट वाटत आहे. मी मराठा समाजाच्या सर्व तरुणांना हात जोडून विनंती करते की, तुमची जी मागणी आहे ती करा, पण त्यासाठी स्वतःचा जीव वैगरे द्यायाचा विचार करु नका. छत्रपती शिवरायांचे आपण वंशज आहोत त्यांच्या विचारांनी लढण्याच्या भूमिकेने लढा. स्वतःचा जीव देण्यासारखे लेकरांनी काम करु नये, या शब्दांत पंकजा मुंडे यांनी मराठा आरक्षणावर रोखठोक भाष्य केले.