औरंगाबाद-
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजपाच नेत्या पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा असा सल्ला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे. औरंगाबादमध्ये 'लोकमत'शी संवाद साधत असताना जलील यांनी पंकजांच्या राजकीय भविष्याबाबत हे महत्वाचं विधान केलं आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली नसल्यामुळे कार्यकर्ते नाराज असून पक्षांतर्गत राजकारणामुळे पंकजांना डावललं जात असल्याचा आरोप केला जात आहे. याच मुद्द्यावर बोलत असताना इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांनी स्वत:चा पक्ष काढण्याची हिंमत दाखवावी असं आवाहन केलं आहे. "भाजपा आज इतका मोठा पक्ष कुणामुळे झाला आहे हे सर्वांना माहित आहे. देशात एकेकाळी या पक्षाचे दोन खासदार होते. लालकृष्ण अडवाणी यांनी देशात तर गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला. राज्यात भाजपा पक्ष वाढविण्यात गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे यांचा मोलाचा वाटा आहे. एकनाथ खडसेंची आज काय अवस्था केली ते ठावूकच आहे. तिच परिस्थिती आज पंकजा मुंडे यांच्यासोबत होत आहे हे उघड आहे. पंकजाचं दुर्दैव हे आहे की तिला तिची ताकद कळून येत नाही. महाराष्ट्रात ओबीसी समाजाची मोठी लोकसंख्या आहे. पंकजांनी जर ठरवलं तर त्या स्वत: वेगळा पक्ष काढू शकतात. त्यांच्यामागे एक मोठा समाज उभा राहू शकतो. त्यांनी स्वत:ची ताकद आजमावून पाहायला हवी", असं इम्तियाज जलील म्हणाले.
"गोपीनाथ मुंडे यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. पंकजांसाठी विधान परिषद म्हणजे खूप लहान गोष्ट आहे. त्यांनी हिंमत असेल तर स्वत:चा पक्ष काढावा आणि मग ताकद काय असते ती बघावी. ओबीसींची आज अवस्था अशी झालीय की त्यांचा नेता नेमका कोण आहे हेच माहित नाही. पण पंकजांनी धाडसी निर्णय घेऊन आपली एक वेगळी ताकद उभी करावी. ओबीसी समाज जर तुमच्या मागे असेल तर उद्या भाजपाच तुमच्याकडे धावून येईल", असंही इम्तियाज जलील म्हणाले.
...तर पंकजांना मदत करूपंकजा मुंडे यांनी जर वेगळा पक्ष काढून ओबीसी समाजाची ताकद निर्माण केली तर आम्ही नक्कीच त्यांच्यासोबत युतीचा विचार करू. कारण एमआयएमचं कुणासोबत जुळू शकेल तर तो दलित आणि ओबीसी समाज आहे. कारण तोही एक वंचित समाज राहिलेला आहे. भाजपानं पंकजांना स्पष्ट संदेश दिला आहे की खडसेंची जी अवस्था केली ती तुमचीही करू. पण गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाजासाठी केलेलं काम लोक विसरलेले नाही. त्यामुळे तुमच्या पाठिमागे काय ताकद आहे हे एकदा पंकजा मुंडे यांनी बाहेर फिरून बघायला हवं आणि धाडस दाखवायला हवं", असं इम्तियाज जलील म्हणाले.
महाराष्ट्रात भूकंप येईलपंकजा मुंडे यांनी जर वेगळा पक्ष स्थापन केला तर भाजपामध्ये मोठा भूकंप येईल असंही जलील म्हणाले. छगन भुजबळांना असं वाटत असेल की ते ओबीसींचे नेते आहेत तर तसं नाही किंवा खडसे देखील ओबीसींचे नेते नाहीत. उद्या पंकजांनी जर वेगळा पक्ष स्थापन करुन ओबीसी समाजाची ताकद निर्माण केली तर मोठा भूकंप होईल. त्यांचं मराठवाड्यात मोठं संघटन आहे आणि गोपीनाथ मुंडेच्या पाठिमागे आजही खूप लोक आहेत, असं जलील म्हणाले.