मुंबई : विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी विजयासाठी आवश्यक कोट्यापेक्षा जास्त मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्यामुळे कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अखेर पंकजा मुंडे विधान परिषदेत विजयी झाल्यामुळे त्यांचा राजकीय वनवास संपला, अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. मला आनंद वाटत आहे. मी पक्षासाठी अधिक जोमाने काम करेन, असे त्या म्हणाल्या. तसेच, माझ्या विजयाचा आनंद लोकांना झाला आहे, याचा फार मला आनंद आहे. जिथे जास्त योगदान देऊ शकेन, तिथं चांगलं काम करेन. आता राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे, या निवडणुकीत ज्यांनी मदत केली. त्या सर्वांचे आभार मानते. लोकांच्या चेहऱ्यांकडे पाहून आनंद वाटतोय, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, २०१९ मधील विधानसभा आणि २०१४ मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी कमबॅक केले आहे. पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी २३ मतांचा कोटा पूर्ण करणे आवश्यक होते. मात्र पंकजा मुंडे यांनी त्यापेक्षा ३ मतं जास्त म्हणजेच २६ मतं मिळवत विजय मिळवला आहे.
मुंडे कुटुंबीय भावनिक! पंकजा मुंडे यांच्या विजयाचा मुंडे कुटुंबीयांना मोठा आनंद झाला आहे. संपूर्ण मुंडे कुटुंब विधानसभा परिसरात एकत्र पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांच्या या विजयानंतर त्यांच्या बहीण आणि माजी खासदार प्रीतम मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना आज सर्वात मोठा आनंद झाल्याचे म्हटले. यावेळी, प्रीतम मुंडे यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू पाहायला मिळाले.