मुंबईकडक शिस्तीसाठी सर्वपरिचीत असलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत अपेक्षीत यश मिळाले नाही. सत्तेत मोठा भाऊ असला तरी, भाजपला शिवसेनेसमोर काही प्रमाणात झुकावं लागणार असंच चित्र दिसत आहे. त्यातच भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सत्ता असली तरी मंत्रीपद मिळविण्यासाठी पंकजा भाजपच्या नियमांच्या कोंडीत अडकण्याची शक्यता आहे.
विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचा दारूण पराभव केला. मतदानाच्या दोन दिवस आधी भाजप नेत्यांकडून धनंजय मुंडे यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्यात आली होती. त्यामुळे वार फिरलं अशी चर्चा बीडमध्ये सुरू झाली होती. परंतु, ही व्हिडिओ क्लिप देखील पंकजा यांना पराभवापासून वाचवू शकली नाही. या पराभवामुळे सत्तेत असणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या मंत्रीपदावर गंडातर येणार आहे.
भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद असा नियम आहे. यामध्ये एकतर विधान परिषद किंवा मंत्रीपद यापैकी एकच मिळणार असं धोरण भाजपचे आहे. या धोरणामुळेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विधानसभेच्या रिंगणात उतरावे लागले. जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रीपद नाही असं धोरण भाजपचं आहे. आता पराभवामुळे पंकजा यांना विधान परिषद मिळणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र त्यांना मंत्रीपद मिळेल याची शाश्वती नाही.
एकूणच विधानसभेला पराभूत झाल्यामुळे पंकजा मुंडे यांचे मंत्रीपद धोक्यात आहे. तरी भाजपमध्येही काही नेत्यांसाठी अपवादात्मक स्थितीत नियम लागू होत नाही. पंकजा यांच्या बाबतीतही असंच होईल, अशी आशा त्यांच्या समर्थकांना लागली आहे.