मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती होणार हे, उभय पक्षांकडून सांगण्यात येत असले तरी दोन्ही पक्षांकडून 'प्लॅन बी' तयार करण्यावर भर देण्यात येत आहे. त्यानुसार अनेक मतदार संघात स्थानिक नेत्यांनी तशी तयारी लावली आहे. बीड जिल्ह्यात देखील याच तयारीची चर्चा सुरू झाली आहे.
राज्यातील नेत्यांच्या पक्षांतरामुळे अनेक ठिकाणी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसमोर पेच निर्माण होणार आहे. बीड विधानसभा मतदार संघात हाच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. २०१४ विधानसभा निवडणुकीत बीड मतदार संघातून भाजपने घटक पक्षाचे नेते विनायक मेटे यांना उमेदवारी दिली होती. मेटेंनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना थोड्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे मेटेंना विधान परिषद देण्यात आली.
दुसरीकडे आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये आपणही संघटन मजबूत करावे या इराद्याने शिवसेनेने राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर यांना पक्षात घेतले. तसेच त्यांना मंत्रीपदाची कुमकही दिली. क्षीरसागर यांच्या मंत्रीपदामुळे पंकजा यांना जिल्ह्यात आव्हान निर्माण झाले. त्यामुळे बीडच्या उमेदवारीसाठी आगामी काळात तिरंगी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून पंकजा मुंडेंचे, शिवसेनेकडून क्षीरसागर आणि घटकपक्ष म्हणून विनायक मेटे बीडच्या जागेसाठी प्रयत्नशील आहेत. मेटे आणि क्षीरसागर यांनी येथून उमेदवारासाठी तयारीही सुरू केली आहे. यात आता पंकजा यांनी आपला हुकमी एक्का पुढे केला आहे.
२०१४ विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतरही विनायक मेटे यांनी बीड विधानसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले. त्यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत पाच सदस्य निवडून आणत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळवले. मेटेंनी उपाध्यक्षपदी राजेंद्र म्हस्के यांना संधी दिली. मात्र पंकजा यांनी राजेंद्र म्हस्के यांना भाजपमध्ये घेत मेटेंच्या प्रयत्नांना सुरूंग लावला. ही चाल यशस्वी ठरली असली तरी क्षीरसागरांची विधानसभेची तयारी पंकजा यांची चिंता वाढविणारी आहे.
दरम्यान यावर पर्याय म्हणून पंकजा मुंडे यांनी बीडमधून राजेंद्र म्हस्के यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या हक्काचा माणूस म्हणून त्यांनी म्हस्केंना पुढं करण्यास सुरुवात केली आहे. पंकजा यांची ही चाल क्षीरसागर आणि मेटे यांना एकप्रकारे शह मानला जात आहे. भविष्यात शिवसेना-भाजप युती तुटल्यास, पंकजा यांच्याकडून म्हस्के यांना बीड विधानसभेसाठी पर्याय पुढे कऱण्यात येत आहे. ही बाब क्षीरसागर आणि मेटे यांची चिंता वाढविणारी आहे.