मुंबई - राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे शिवसेना आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करून सत्तास्थापनेसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. 50-50 फॉर्म्युल्यावरून भाजपने भूमिका बदलल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे. मात्र पेचात माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा रेंगाळला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. परळी मतदार संघातून धनंजय मुंडे मोठ्या मताधिक्याने विजय झाले. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा चर्चेत आला होता. गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे तसेच शेवगावच्या आमदार मोनिका राजळे यांनी पंकजा मुंडेंसाठी राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती.
दरम्यान पंकजा यांना विधान परिषदेवर घेण्याची चर्चा देखील मोठ्या प्रमाणात सुरू होती. मात्र भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद यानुसार पंकजा यांना विधान परिषद दिल्यानंतर मंत्रीपद देता येणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे पंकजा मुंडे कोणत्या मार्गाने विधीमंडळात जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली होती. मात्र शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी असं सत्ता समिकरण जुळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे विधान परिषदेवरच जाणार अशी दाट शक्यता आहे.