लोणी-धामणी : धामणी (ता. आंबेगाव) येथे मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे फार मोठे नुकसान झाले, त्याचे पंचनामेसुद्धा झाले; पण आजपर्यंत एक पैसाही नुकसान म्हणून मिळाला नाही. येत्या आठ दिवसांत जर नुकसानभरपाईचे पैसे मिळाले नाही, तर येथील तलाठी कार्यालयासमोर शेतकरी लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत, अशी माहिती उपसरपंच अंकुश भूमकर यांनी दिली आहे. मागील मार्च-एप्रिल महिन्यात धामणी व परिसरातील वाड्या-वस्त्या, मळे येथे गारपिटीचा व अवकाळी पावसाचा फार मोठा तडाखा बसल्याने येथील शेतकर्यांच्या शेतातील कांदा, गहू, कलिंगड, फळबागा व तरकारी पिकांना फार मोठा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत प्रशासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, अद्याप मदत मिळालेली नाही. वाळुंजनगर (ता.आंबेगाव) येथे मार्च व एप्रिलमध्ये झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने शेतकर्यांचे फार मोठे नुकसान झाले; पण नुकसानग्रस्त शेतकर्यांचे कृषी विभाग, तलाठी व ग्रामसेवकांच्या हलगर्जीपणामुळे पंचनामेच झाले नाहीत, अशी तक्रार येथील सरपंच उषा वाळुंज व उपसरपंच महेंद्र वाळुंज व नुकसानग्रस्त शेतकर्यांनी केली आहे. येथील उपसरपंच म्हणाले की, आम्ही गारपीट व अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकर्यांचे पंचनामे करा, असे येथील कृषी पर्यवेक्षक, तलाठी व ग्रामसेवकाला सांगितले; पण त्यांनी आम्हाला वाळुंजनगर येथील शेतकर्यांच्या पंचनाम्यासंदर्भात आदेश नाही, अशी टोलवा-टोलवीची उत्तरे दिली.
पंचनामे झाले : भरपाई कधी?
By admin | Published: May 10, 2014 4:50 PM