ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 17- काँम्रेड गोविंद पानसरे हत्ये प्रकरणी संशयित आरोपी समीर गायकवाड याला सशर्त जामीन मंजूर झाला आहे. जिल्हा सत्र न्यायालयात आज समीर गायकवाडच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर समीर गायकवाडला जामीन मंजूर झाला आहे.
पण हा जामीन मंजूर करताना अनेक अटी कोर्टाने घातल्या आहेत. समीर गायकवाडला महाराष्ट्राबाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करायला बंदी घालण्यात आली आहे. तसंच दर रविवारी तपास यंत्रणांकडे हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. समीर गायकवाडला त्याचा पासपोर्ट कोर्टाच्या ताब्यात देण्याते आदेश आज कोर्टाने सुनावणी दरम्यान दिले आहेत. जामीनकाळात समीर गायकवाड याला निवासाचा पत्ता देणंसुद्धा कोर्टाने बंधनकारक केलं आहे.
समीर गायकवाडला एसआयटीने १६ सप्टेंबर २०१५ ला अटक केली होती. त्याच्या जामीनासाठी यापूर्वी चारवेळा सुनावणी झाली. शनिवारी सकाळी न्यायालयाने त्याचा निकाल दिला. गायकवाड याची २५ हजाराच्या जातमुचलक्यावर मुक्तता करण्यात आली. परंतू हे करताना न्यायालयाने त्याच्यावर कांही निर्बंध घातले. त्यानुसार समीर गायकवाड याला दर रविवारी ११ ते १ वाजता विशेष तपास पथकाच्या कोल्हापुरातील कार्यालयात हजेरीस यावे लागेल. कोल्हापूर जिल्ह्यात त्यास इतरत्र कुठेही प्रवेश करता येणार नाही. साक्षीदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालय त्याची गंभीर दखल घेईल. त्याचा पासपोर्ट न्यायालयाकडे जमा करावा लागेल व बाहेर कुठेही जायचे असेल तर तो कुठे जाणार आहे, तिथे कुणाकडे राहणार आहे हे कळविणे बंधनकारक असेल. आपल्या वर्तनाने कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल.
पानसरे त्यांच्या येथील सागरमाळ परिसरातील घरापासून मॉर्निंग वॉकहून परत येताना त्यांच्यासह पत्नी उमा पानसरे यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या चार मारेकºयांनी १६ फेब्रुवारी २०१५ ला गोळीबार केला होता. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पानसरे यांचा २० फेब्रुवारीला उपचार सुरु असताना मुंबईतील जे.जे.रुग्णालयात मृत्यू झाला होता. उमा पानसरे यांच्याही डोक्याला गोळी चाटून गेली होती परंतू त्यातून त्या बचावल्या. त्यानंतर विशेष तपास पथकांने ‘सनातन’ संस्थेचा पूर्ण वेळ साधक असलेल्या समीर गायकवाड याला १६ सप्टेंबर २०१५ अटक केली होती. तेव्हा पासून तो पोलिसांच्या ताब्यात होता.