भीमगोंडा देसाई , कोल्हापूरजिल्ह्यातील २६८ एकरांपेक्षा अधिक देवस्थानच्या जमिनींची बेकायदा विक्री झाल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्षात यापेक्षा अधिक जमिनींची विक्री झाल्याचा संशय आहे. जिल्हा महसूल विभागाच्या पाहणीतून हे चित्र समोर आले आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचे तब्बल ५ हजार ७७० फेरफार रद्द करून संबंधित जमिनीस मालक म्हणून देवस्थानचे नाव लावण्याची प्रक्रिया महसूल यंत्रणा करीत आहे. तालुका पातळीवरील प्रांताधिकाऱ्यांसमोर फेरफाराची सुनावणी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देवस्थानची एकूण १८ हजार ९६१ हेक्टर जमीन आहे. या जमिनीचे मालक शासन म्हणजे त्या-त्या गावातील देवस्थान आहे. जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून देवस्थानची पूजाअर्चा, देखभाल, दुरुस्ती करावी, असे अपेक्षित आहे. या जमिनी अनेक वर्षांपासून गावातील विशिष्ट कुटुंबांकडेच कसण्यासाठी आहेत. अनेक ठिकाणी देवस्थानच्या जमिनींवर कसणाऱ्यांची नावे वहिवाटदार म्हणून लागली आहेत, पण कायद्यानुसार ही जमीन विकता येत नाही. मालक म्हणून कसणाऱ्याचे नाव लावता येत नाही. जमिनीला सोन्याचा भाव येत आहे. त्यामुळे स्थानिक महसूल यंत्रणेला हाताशी धरून देवस्थान जमिनींची विक्री होत आहे. नोंदणी कार्यालयातील यंत्रणा कायद्यातील पळवाट शोधून खरेदी-विक्रीचे व्यवहार करीत आहेत. सुनावणी होऊन ४२ फेरफार रद्द करण्यात आले आहेत.
देवस्थानच्या जमिनी विकण्याचा सपाटा
By admin | Published: February 04, 2016 3:51 AM