पनवेल : अॅट्रॉसिटी बचाव महामोर्चाचे आयोजन गुरुवार, ३ नोव्हेंबर रोजी नवीन पनवेल आदई सर्कलपासून ते पनवेल प्रांत कार्यालयापर्यंत बहुसंख्येने अनुसूचित जाती जमाती तसेच इतर समाजाच्या मंडळांच्या उपस्थितीत व महिलांच्या साथीने करण्यात आले होते. अॅट्रॉसिटी कायदा अधिक बळकट करण्यात यावा, या कायद्यांतर्गत खटल्यांचा सहा महिन्यांत निकाल काढण्यात यावा, दलित व आदिवासी यांना शस्त्र परवाने देण्यात यावेत, आदिवासींचे कुपोषण ताबडतोब थांबवावेत, पोलिसांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसाठी अॅट्रॉसिटी बचाव महामोर्चाचे आयोजन पनवेल येथे करण्यात आले होते.हा मोर्चा अभ्युदय बँक, नवीन पनवेल ते आदई सर्कल ते एचडीएफसी सर्कल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पनवेल ते शिवाजी चौक ते जुना तहसील ते प्रांत कार्यालय असा काढण्यात आला. या महामोर्चात सुभाष गायकवाड, नरेंद्र गायकवाड, बी.पी. लांडगे, संजय गायकवाड, संजय सोनावणे, मोहन डाकी, एकनाथ खापरे, संतोष कीर्तीकर, धनाजी वाहूरकर, बाळू भालेकर, शोभा जाधव, रमाताई अहिरे, विशाखा इंगोले आदींसह मोठ्या प्रमाणात बहुजन समाज सहभागी झाला होता. या मोर्चाच्या सांगतेच्यावेळी चिमुरडी संस्कृती चंदने हिने भाषण केले. त्याचप्रमाणे उपस्थित विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा या महामोर्चात मार्गदर्शन केले. पनवेलसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड येथून हजारोंच्या संख्येत बहुजन व इतर समाजसमूह भीमसैनिक उपस्थित होता.
पनवेलमध्ये अॅट्रॉसिटी बचावासाठी महामोर्चा
By admin | Published: November 04, 2016 7:44 AM