ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - पनवेल, भिवंडी आणि मालेगाव या तीन महानगरपालिकांच्या निवणुकांसाठी तारीख जाहीर झाली असून 24 मे रोजी मतदान होणार आहे.
राज्यातील पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 मे रोजी मतदान होणार असून 26 मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित महानगरपालिकांच्या क्षेत्रांत आजपासून आचारसंहिता लागू झाली, असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत केली.
नवनिर्मित पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. भिवंडी महानगरपालिकेची मुदत 10 जूनला संपत आहे, तर मालेगाव महानगरपालिकेची मुदत 14 जूनला संपत आहे. तसेच, निवडणूक आयोगाने 5 जानेवारीला प्रसिद्ध केलेली विधानसभा मतदार संघाची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरली जाणार असल्याची माहिती सहारिया यांनी दिली.
एकूण 64 प्रभागातील 252 जागांसाठी निवडणूक होत असून इच्छूक उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे सादर करण्यासाठी संगणकीय प्रणालीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांना 29 एप्रिलपासून 6 मे पर्यंत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येणार आहेत. तसचे, 30 एप्रिलला रविवार असला तरी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. मात्र, 1 मे रोजी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत, असेही सहारिया यांनी यावेळी स्पष्ट केले.
निवडणूक कार्यक्रम...
- नामनिर्देशनपत्रे सादर करणे- 29 एप्रिल ते 6 मे 2017
- नामनिर्देशनपत्रांची छाननी- 8 मे 2017
- उमेदवारी मागे घेणे- 11 मे 2017
- निवडणूक चिन्ह वाटप- 12 मे 2017
- उमेदवारांची अंतिम यादी- 12 मे 2017
- मतदान- 24 मे 2017 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30)
- मतमोजणी- 26 मे 2017