- वैभव गायकर
पनवेल : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. पनवेल-चिपळूणरेल्वेची डीएमयू सेवा ४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. गणेशोत्सवानिमित्त ही रेल्वे सेवा सुरू करण्यात आली आहे. पनवेल रेल्वे स्थानक सल्लागार समितीच्या बैठकीत शुक्रवारी याबाबतची माहिती देण्यात आली.
४ सप्टेंबर ते ३0 सप्टेंबरपर्यंत रेल्वे धावणार आहे. ही रेल्वे १२ डब्यांची असून यामध्ये एक प्रथम दर्जाचा आणि एक महिलांसाठी आरक्षित डबा असणार आहे. तसेच, या रेल्वेचे तिकिट आरक्षित नसून प्रवाशांना करंट बुकिंग करावे लागणार आहे. पनवेलमधील जुन्या रेल्वे स्थानकाच्या खिडकीवर प्रवाशांना तिकिटे उपलब्ध होतील. या रेल्वे प्रवासाचे तिकीट फक्त ५0 रूपये आहे.
याचबरोबर, ही रेल्वे सकाळी ११ वा. १0 मिनिटांनी सुटणार आहे. रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सपे वामने, करंजाडी, विनहेरे, दिवानखावटी, खेड, अंजनी, चिपळूण आदी ठिकाणांहून प्रवास करीत त्याच दिवशी संध्याकाळी चिपळूणला ४ वा. पोहचेल. चिपळूणहून ही रेल्वे सायं. ५.३0 वा. पनवेलकडे याच मार्गाने रात्री १0.३0 वाजता पोहोचेल.