नामदेव मोरे, नवी मुंबईरायगड जिल्ह्यात सर्वात श्रीमंत व भौतिक सुविधा उत्तम असणारा तालुका म्हणून पनवेलची ओळख निर्माण झाली आहे. येथील ८४,७१३ कुटुंबीयांकडे स्वत:चे वाहन, २५,०३१ जणांकडे संगणक व लॅपटॉप आहे. १,१७,३६५ नागरिक मोबाइल वापरत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.देशातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून पनवेलची ओळख निर्माण होऊ लागली आहे. दक्षिण नवी मुंबई परिसरात येणाऱ्या या तालुक्यामध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहे. मेट्रो रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आहे. नैना परिसरामध्ये २७० गावांचा व त्या परिसराचा विकास होणार आहे. मुंबईतील प्रमुख रेल्वे टर्मिनलही या ठिकाणी आहे. वर्तमान स्थितीमधील सुविधा व भविष्याचा वेध घेऊन अनेक नागरिक घर खरेदीसाठी पनवेलला प्राधान्य देवू लागले आहेत. यामुळेच या परिसरामधील नागरिकांचा आर्थिक स्तर रायगड जिल्ह्यात सर्वात चांगला आहे. शासनाने केलेल्या आर्थिक सामाजिक सर्वेक्षणामध्येही हा तालुका सर्वच भौतिक सुविधांमध्ये सर्वोत्तम आहे. जिल्ह्यात ५,९६,५१४ कुटुंब आहेत. यामधील ३,९१,६०३ कुटुंबीयांकडे बँक खाते आहे. यामध्ये पनवेलमधील १,३२,५५७ कुटुंबांचा समावेश आहे. पूर्ण जिल्ह्यात ६२% घरांमध्ये टीव्ही आहे. पनवेलमध्ये हेच प्रमाण ८० % आहे. पूर्ण जिल्ह्यामध्ये ९.६८% नागरिकांकडे लॅपटॉप व संगणक आहेत. पनवेलमध्ये हे प्रमाण १५ % आहे.जिल्ह्यामध्ये मोबाइल मोटारसायकल व स्वत:ची कार असणाऱ्या नागरिकांमध्येही पनवेलकरांचा पहिला क्रमांक आहे. देशामध्ये झपाट्याने आर्थिक व सामाजिक स्तर वाढणाऱ्या शहरांमध्ये पनवेलचा समावेश होऊ लागला आहे. देशातील उच्च शिक्षणाचे देशातील महत्त्वाचे केंद्र या ठिकाणी आहे. ठाणे - बेलापूरसह तळोजा औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. बांधकाम व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. ५० टक्के नागरिकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे बांधकाम व्यवसायामुळे रोजगार उपलब्ध होत आहे. मुंबई, नवी मुंबई व ठाणेच्या तुलनेमध्ये घरांच्या किमती नियंत्रणामध्ये आहेत. यामुळेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या नागरिकांना पनवेल आवडू लागले आहे. एकेकाळी पनवेल ही कोकणामधील प्रमुख बाजारपेठ होती. प्रस्तावित विमानतळ नयना क्षेत्र यामुळे पनवेलला पुन्हा गतवैभव प्राप्त होऊ लागले आहे.नागरिकांचा वैयक्तिक स्तर वाढत असला तरी सामाजिक विकासाचा स्तर त्या प्रमाणात वाढत नाही. प्रत्येक नागरिकाच्या हातात मोबाइल आला आहे. घरात टीव्ही, फ्रीज, संगणक, लॅपटॉप, मोटारसायकल, कार, बँक बॅलन्स वाढला आहे. परंतु येथील नागरिकांना श्वास घेण्यासाठी प्रदूषणमुक्त वातावरण या परिसरामध्ये नाही. परिसरातील नागरिकांसाठी चांगली उद्याने नाहीत, प्रत्येक नोडमध्ये अधिकृत मार्केट नाही, मुलांना खेळण्यासाठी चांगली मैदाने नाहीत, वाहने उदंड झाली पण ती उभी करण्यासाठी वाहनतळ नाही, नागरिकांना स्वस्त उपचार देण्यासाठी आरोग्य व्यवस्थाही नाही, विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास सुरू आहे, खारफुटी नष्ट केली जात आहे. गाढी नदीचे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न सुुरू आहे. नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त होऊलागले आहे. भविष्याचा वेध घेऊन पाणी, घनकचरा व्यवस्थापन, अत्याधुनिक मलनिस्सारण केंद्र याविषयी ठोस योजना राबविल्या जात नाहीत. यामुळे भौतिक प्रगती जिल्ह्यात सर्वात जास्त असली तरी सार्वजनिक सुविधा मात्र अद्याप अद्ययावत झालेल्या नाहीत.
जिल्ह्यात श्रीमंतीमध्ये ‘पनवेल’ प्रथम
By admin | Published: March 06, 2016 2:01 AM