ऑनलाइन लोकमत
पनवेल, दि. 26 - महापालिका निवडणुकीमध्ये तब्बल 160 करोडपती उमेदवार भविष्य अजमावत होते. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव व आमदार प्रशांत ठाकूर यांचे लहान भाऊ परेश ठाकूर यांनी 95 कोटी रूपयांची मालमत्ता जाहीर केली होती.
सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याने प्रभाग 19 मधील निवडणुकीकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या प्रभागात परेश यांच्यासह सर्व जागेवर भाजपाने विजय मिळवला आहे.
दरम्यान, पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. पाटील शेतकरी कामगार पक्षाचे प्रमुख उमेदवार असून त्यांचे भाऊ पनवेल बाजारसमितीचे सभापती आहेत.
महापालिका निवडणुकीमध्ये सर्वाधिक हायटेक प्रचार त्यांनी सुरू केला होता. त्यांच्या पराभवामुळे शेकापला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत हिलाही पराभवास सामोरे जावे लागले आहे.
काँग्रेसचे नेते लतीफ शेख यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. पनवेलमध्ये भाजपाच्या लाटेमध्ये शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
तर दुसरीकडे, पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे. 20 प्रभागांमधील 78 पैकी 51 जागांवर आघाडी घेतली आहे. प्रतिस्पर्धी शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी फक्त 25 जागांवर आघाडीवर आहे.
महापालिकेची पहिलीच निवडणुक असल्याने सर्वच राजकिय पक्षांनी पनवेलवर लक्ष केंद्रीत केले होते. भविष्यात या परिसरात येणारा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना विकास क्षेत्र व सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या कामांमुळे देशातील मुंबईनंतरचे प्रमुख शहर म्हणून पनवेलची ओळख निर्माण होत आहे. सिडको व खाजगी विकासकांच्या माध्यमातून पाच वर्षात 60 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या परिसरात होत असल्याचे महापालिकेच्या निवडणुकीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.
मतमोजणीच्या पहिल्या दोन तासामध्येच भाजपाने जोरदार मुसंडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. आरपीआयला सोबत घेवून सर्व 78 जागा लढविणा-या भाजपाने 51 जागांवर आघाडी घेतली आहे. रायगडमधील सर्व सहकारी संस्था, जिल्हा परिषद ताब्यात असलेल्या शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला मतदारांनी नाकारल्याचे प्राथमीक चित्र दिसत आहे. शेकाप आघाडी 25 जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदेश बांदेकर, एकनाथ शिंदे व डझनभर सेना नेत्यांनी प्रचार करूनही शिवसेनेला अद्याप समाधानकारक यश आलेले नाही. फक्त एक जागेवर यश मिळाले आहे.
पक्षीय बलाबल
महाआघाडी : शेकाप 48, काँग्रेस 18, राष्ट्रवादी 12
भाजपा - 78
शिवसेना -65
स्वाभिमानी शेतकरी संघटना- 13