वर्धा – टीईटी पेपरफुटी प्रकरणात आरोपी असलेल्या प्रीतीश देशमुखची मोहमाया पाहून तुमचेही डोळे चक्रावतील. जी ए सॉफ्टवेअरचा डॉ. प्रीतीश देशमुख हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना हाताशी धरून वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षांमध्ये गैरव्यवहार करीत असल्याचे आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. प्रीतीशनं आरोग्य, म्हाडा, टीईटीबरोबर आणखी काही परीक्षांच्या पेपरमध्ये घोटाळे केले असल्याचा संशय असून, हे सर्व जण या परीक्षांसाठी चालविणाऱ्या जाणाऱ्या क्लासचालकांचे एक संपूर्ण रॅकेटच असल्याचं निष्पन्न झालं आहे.
पेपरफुटी प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुख हा वर्ध्याचा रहिवासी असून याठिकाणी त्याने बरीच माया जमवल्याचं समोर येत आहे. प्रीतीश देशमुख याचे शहरातील सेवाग्राम मार्गावर स्नेहलनगर येथे घर आहे. त्याचे वडील गणित विषयाचे प्राध्यापक आहेत जे नुकतेच निवृत्त झाले आहेत. मूळचे बुलडाणा जिल्ह्यातील असलेले हे देशमुख कुटुंब वर्ध्यात नोकरीच्या निमित्ताने स्थायिक झाले. प्रीतीश देशमुखला राजकारणातही खूप रस आहे. एकदा त्याने एका नेत्याला मला विधानपरिषदेचे आमदार बनायचंय अशी इच्छा व्यक्त केली होती.
वर्ध्यात बनवलाय ‘राजवाडा’
स्नेहलनगर भागात राहणाऱ्या प्रीतीश देशमुखांनी ‘राजवाडा’ नावानं आलिशान बंगला आहे. याच बंगल्यासमोरील तब्बल ८ हजार स्क्वेअरफूट जागा खरेदी केल्याचीही चर्चा आहे. याठिकाणी त्याचे आईवडील राहतात. तर प्रीतीश २ महिन्यातून एकदा या निवासस्थानी येत असे. ८-१० दिवस इथं राहून पुन्हा तो पुण्याला परतायचा. इतक्या कमी काळात एवढी माया जमवलेली पाहून परिसरातील नागरिकही आश्चर्य व्यक्त करतात.
अलीकडेच देशमुख यांच्या कार्यालयात २३ हार्ड डिस्क, १ सीम कार्ड, ४१ सी डी, १ फ्लॉपी डिस्क व इतर कागदपत्रे मिळाली असून, घरझडतीमध्ये माबाईल, १ लॅपटॉप, ४ पेनड्राईव्ह, इतर कागदपत्रे मिळाली आहेत. डॉ. देशमुख, अंकुश हरकळ, संतोष हरकळ या आरोपींकडून वेगवेगळ्या परीक्षांच्या उमेदवारांच्या याद्या मिळाल्या आहेत. संतोष हरकळ याच्या लॅपटॉपमध्ये काही महत्त्वाची माहिती मिळाली असून, त्या माहितीचे विश्लेषण करण्यात येत आहे. त्यातून आणखी काही एजंटांची माहिती तसेच परीक्षार्थ्यांची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.