नामदेव मोरे - नवी मुंबई
विधानसभा निवडणूक सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. प्रत्येक मतदाराचे महत्त्व लक्षात घेऊन गावाकडील नेत्यांनी आता मुंबईतील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये मेळावे घेतले जात असून जन्मभूमीच्या विकासासाठी मतदानास गावी येण्याचे आवाहन केले जात आहे.
विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले असून राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे. यामुळे आतार्पयत गावी मतदान करायचे व नंतर शाई पुसून पुन्हा मुंबईत मतदान करता येणार नाही. यामुळे मुंबई व ग्रामीण भागातील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. ग्रामीण भागातील विशेषत: सातारा, पुणो जिल्ह्यातील नेत्यांनी एकाच दिवशी मतदानाची शक्यता गृहीत धरून यापूर्वीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जुलैपासूनच मुंबईमधील चाकरमान्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सातारा-जावी मतदारसंघातील उमेदवार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मुंबई व नवी मुंबईमध्ये तीन मेळावे घेऊन चाकरमान्यांना गावी येण्याचे आवाहन केले आहे. जलसंपदा मंत्री (कृष्णा खोरे) शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातील रहिवाशांचा मेळावा घेतला. डॉ. अतुल भोसले यांनी कराड दक्षीत मतदारसंघातील रहिवाशांचा नवी मुंबईमधील माथाडी भवनमध्ये मेळावा आयोजित केला होता. सातारा जिल्ह्यातील चुरशीची लढत होणा:या माण-खटाव मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व येथील इच्छुक उमेदवार अनिल देसाई यांनीही कळंबोलीमध्ये मेळावा घेऊन मतदारांना गावी येण्याचे आवाहन केले. पुणो जिल्ह्यातील जुन्नर, खेड व आंबेगावमधील रहिवाशांचा मेळावा शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या उपस्थितीत केला होता. चाकरमान्यांना कोणत्याही स्थितीत मतदानासाठी गावी घेऊन जाण्यासाठी मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. याचा फटका मुंबई व नवी मुंबईमधील उमेदवारांना बसणार आहे.
च्या निवडणुकीत मुंबईतील चाकरमान्यांचे महत्त्व वाढले आहे. चाकरमानी गावी आले की एकगठ्ठा मतदान होते. कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा मोठा प्रभाव पडतो. यामुळे यावेळी चाकरमान्यांना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई, नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली
ग्रामीण भागातील नेत्यांचे मुंबईतील दौरे वाढले आहेत. चाकरमान्यांना भावनिक साद घातली जात आहे. यामुळे हजारो चाकरमानी मतदानासाठी गावी जाणार हे निश्चित झाले आहे. यामुळे मुंबई व नवी मुंबईतील नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांचे स्थलांतर थांबविण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.