मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याला गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी वळीवाने झोडपले. विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शेतमालाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. कोल्हापूर शहरासह आजरा, कागल, करवीर, हातकणंगले, राधानगरी, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड मलकापूर या तालुक्यात सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला. सांगली शहरासह वाळवा, शिराळा आणि खानापूर तालुक्यांनाही पावसाने जोरदार तडाखा दिला. तर शिराळा तालुक्यात काही ठिकाणी गारपीट झाली. खानापूर पूर्वभागातही मध्यरात्री गारा पडल्या. सातारा जिल्ह्यातील फलटण, शिरवळ, पाटण, औंध, कोरेगाव व मेढा परिसरातही जोरदार पाऊस झाला. सोलापूर जिल्ह्यात करमाळा, पंढरपूर, माळशिरस, सांगोल्यासह अक्कलकोट तालुक्यात वादळी वारा व मेघगर्जनेसह दुपारी जोरदार पाऊस झाला. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर वळीवाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याने कुडाळ तालुक्यातील शिवापूर आणि परिसरात मोठी पडझड झाली. दरम्यान, चंदगडमधील जंगमहट्टी (जि. कोल्हापूर) येथे मयूरेश तुप्पट (५) या अंगणवाडीतील बालकाचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. तर शेतात सिमेंटच्या विटांची भिंत अंगावर पडल्याने अंकली (जि. सांगली) येथील श्रीकांत पाटील (६०) यांचा मृत्यू झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) चार दिवसांत राज्यात सगळीकडे पाऊसमुंबई : राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, विदर्भासह मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र ठिकठिकाणी गारांसह पावसाचा मारा सुरूच आहे. येत्या चार दिवसांसाठी राज्यात असेच वातावरण राहणार असून, कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह ठिकठिकाणी पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
प. महाराष्ट्रासह कोकणात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
By admin | Published: May 05, 2017 3:57 AM