मुंबई: एल्गार परिषद प्रकरणाच्या तपासावरुन महाविकास आघाडीत असलेले मतभेद वारंवार समोर येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एसआयटीच्या चौकशीची केलेली मागणी, मात्र तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एनआयएकडे तपास सोपवण्यास दिलेली मंजुरी यामुळे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल नसल्याचं दिसलं. यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत दिले आहेत. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एल्गार प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. मात्र हा तपास राज्य सरकारनं एसआयटीच्या माध्यमातून करावा, अशी आग्रही मागणी शरद पवारांनी आधीच केली होती. यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवल्यानं शरद पवारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. केंद्राचा निर्णय अयोग्य असून मुख्यमंत्र्यांनी त्याला दिलेली मंजुरी त्याहूनही अयोग्य असल्याचं पवार म्हणाले होते.यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा समांतर तपास केला जाऊ शकतो का, याबद्दल कायदेशीर सल्ला घेत असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. गृह मंत्रालयाकडून या प्रकरणी एसआयटी स्थापन केली जाऊ शकते, याचे संकेत देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि ठाकरे आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आघाडीत बिघाडी? शरद पवार म्हणतात, मुख्यमंत्र्यांच्या 'तो' निर्णय अतिशय अयोग्यअनिल देशमुख यांनी एल्गार प्रकरणाच्या चौकशीचे स्पष्ट संकेत दिले असताना आज सकाळी जळगावात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं. भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेची चौकशी ही दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचं पवार म्हणाले. सत्य दडपण्यासाठीच केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप केला आणि राज्याकडून तपास काढून घेतला, असं पवार यांनी म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी तपास एनआयएकडे सोपवला असताना राष्ट्रवादीकडून एसआयटीमार्फत चौकशीचे संकेत दिले जात असल्यानं महाविकास आघाडीतले मतभेद दिसून येत आहेत.
शरद पवारांची 'ती' मागणी वाढवणार मुख्यमंत्री ठाकरेंच्या अडचणी?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 10:24 AM