जमीर काझी
ज्येष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी आजारपणाची रजा (सिक लिव्ह) वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांच्याविरुद्ध करत असलेली चौकशी रखडली आहे. पाठीचा आजार बळावल्याचे कारण देत त्यांनी ही रजा वाढवल्याचे सूत्रांनी सांगितले. परमबीर सिंग हे गेल्या ३० एप्रिलपासून रजेवर आहेत. त्यापैकी सुरुवातीचे काही दिवस वगळता ते ‘सिक लिव्ह’वर आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील गंभीर आरोपांबाबतची चौकशी प्रलंबित राहिली आहे.
परमबीर यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे याला दर महिन्याला १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गौप्यस्फोट केला. याप्रकरणी सध्या सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे, तर देशमुख यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. परमबीर यांच्याविरुद्धही भ्रष्टाचार, खंडणीच्या तक्रारी आल्या आहेत. त्यापैकी काहींबद्दल गुन्हे दाखल तर काहींची सीआयडी व अन्य यंत्रणेकडून चौकशी सुरू आहे.
परमबीर यांनी केलेल्या सेवा नियमांचे उल्लंघन व मलबार हिल पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनुप डांगे यांना जाणीवपूर्वक दिलेला त्रास व भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत प्राथमिक चौकशी नियोजन विभागाचे अप्पर सचिव देबशिष चक्रवर्ती यांच्याकडे आहे. त्यांना याप्रकरणी तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना होती. मात्र, परमबीर सिंग हे एकदाही चौकशीला हजर झालेले नाहीत, त्यांचा जबाबही पाठविण्यात आलेला नाही, त्यासाठी आजारी असल्याचे कारण त्यांनी दिल्याचे समजते.
संजय पांडेंचा केला होता कॉल रेकॉर्डपरमबीर यांची प्राथमिक चौकशी सुरुवातीला अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे दिली होती. त्यांनी ती सुरू करण्यापूर्वी परमबीर सिंग यांनी ‘कॉल ऑन’साठी भेट घेतली, त्यानंतर व्हॉट्सॲप कॉल करून त्यांचे पत्र मागे घेण्याबद्दल वदवून घेतले, ते संभाषण रेकॉर्ड करून न्यायालयात सादर केले. त्यामुळे पांडे यांना स्वतःहून चौकशीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरला नाही.