परभणीत शिवसेनेच्या गडाला खिंडार पाडण्याचे काँग्रेस पुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 12:35 PM2019-07-17T12:35:23+5:302019-07-17T16:36:23+5:30
दुसरीकडे मात्र अजूनही काँग्रेसला सक्षम असा उमदेवार मिळत नसल्याची चर्चा आहे.
मुंबई - लोकसभेनंतर आता सर्वच विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रणधुमाळीने वेग घेतला आहे. परभणी मतदारसंघात ही इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. परभणी विधानसभा मतदारसंघ ३० वर्षांपासून सेनेच्या ताब्यात असून, या मतदारसंघाला शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेसला यावेळी प्रचंड मेहनत करावी लागणार आहेत.
परभणी जिल्ह्यात एकूण चार मतदारसंघ आहेत. त्यात जिंतूर आणि गंगाखेड येथे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्याने. उरलेले परभणी व पाथरी हे मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला येणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जाते. मात्र परभणी मतदारसंघाचा विचार केला तर , ह्या मतदारसंघात शिवसेनेची पकड असून ३० वर्षांपासून इथे सेनेचाच आमदार निवडणून येत असल्याचा इतिहास आहे. तर युतीकडून यावेळी पुन्हा शिवसेनेचे विद्यमान आमदार राहुल पाटील यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे.
दुसरीकडे मात्र अजूनही काँग्रेसला सक्षम असा उमदेवार मिळत नसल्याची चर्चा आहे. मागच्यावेळी काँग्रेसकडून लियाकत अंसारी रिंगणात होते. तर यावेळी सुद्धा काँग्रेसमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी आहे. विधान परिषदेचे माजी आमदार सुरेश देशमुख, महानगरपालिका उपसभापती गणेश वाघमारे हे सुद्धा इच्छुक आहेत. मात्र असे असतानाही राहुल पाटील यांना आव्हान देणारा सक्षम उमेदवार काँग्रेसमध्ये नसल्याची चर्चा पहायला मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीचा निकाल पहिला तर जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सुद्धा याकडे कानाडोळा करता येणार नसून, याचा फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमदेवाराला बसणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात सेनेचे खासदार संजय जाधव यांची सुद्धा परभणी मतदारसंघात चांगली पकड असल्याने याचा फायदा युतीला होणार असल्याचे दिसत आहे.