परभणी, दि. 17- पाथरी तालुक्यातील जवळा झुटा गावात चांदिकराम ऐडके या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येते आहे. विहिरीमध्ये उडी मारून या शेतकऱ्याने आपलं जीवन संपवलं. चांदिकराम ऐडके हे रविवारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर येते आहे. जवळाझुटा गावातील शेतकरी आत्महत्येची ही 15 दिवसातील तिसरी घटना आहे. सुखदेव ऐडके असं चांदिकराम ऐडके यांच्या वडिलाचं नावं आहे. सुखदेव यांच्या नावे तीन एकर शेती होती. सुखदेव यांना तीन मुलं असून दरवर्षी एक मुलगा शेती करायचा. यंदा चांदिकराम यांना शेती कसायची होती. शेतात पेरणी केली पण त्यानंतर बळीराजाने पाठ फिरवल्यामुळे चांदिकराम यांना दुबार पेरणी करावी लागली. पण दुबार पेरणी करूनही हाताला पीक आलं नसल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं. याच आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केली, अशी माहिती सुखदेव ऐडके यांनी दिली आहे. चांदिकराम ऐडके हे ऊसतोड कामगारही होते.
दरम्यान, याआधी 3 ऑगस्ट रोजी चांदीकदास झुटे यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली होती. तर 8 ऑगस्टला त्यांच्या पुतणीने सारिका झुटेने वडिलांना नापिकी असल्याने माझ्या लग्नाचा त्रास नको यामुळे आत्महत्या केली होती.