परभणी : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत गोरगरिबांसाठी आलेले १९ हजार १४१ क्विंटल धान्य गायब झाल्याचा प्रकार मुंबईच्या पथकाने केलेल्या तपासणीत समोर आला. पाच कोटी रुपयांचे धान्य परस्पर काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी गोदामपालासह मुकदमाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे घोटाळा उघडकीस आल्यानंतर गेल्या २४ तासांत ही सर्व कारवाई झाली. जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांनी तहसीलदार संतोष रुईकर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठविला आहे. तसेच पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार चिंतामणी पांचाळ यांना निलंबित केल्याचे आदेश काढले आहेत. शासकीय गोदामाचे गोदामपाल अनिल नागोराव आंबेराव आणि मुकदम शेख महेबूब शेख इब्राहीम यांनी जुलै २०१३ पासून टप्प्या-टप्प्याने गोदामातील हा धान्यसाठा दलाल व हस्तकांमार्फत विक्री केल्याचे निदर्शनास आले. ४ कोटी ९७ लाख ६९ हजार ९२९ रुपयांचा गैरव्यवहार या दोघांनी केला असून, हा गैरव्यवहार आपण केला असल्याचे गोदामपाल अनिल आंबेराव याने कबूलही केले. तसेच स्वत:हून १२ लाख २० हजार रुपयांच्या शासन नुकसानीपोटी जमा केल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे़ गोदामांतील १३ हजार ८४१ क्विंटल गहू आणि ५,३०० क्विंटल तांदूळ काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री केले आणि बनावट कागदपत्र सादर करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आंबेराव आणि शेख महेबूब या दोघांविरुद्धही कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. जिल्हा पुरवठा अधिकारी दिलीप कच्छवे यांनी या प्रकरणात कोतवाली पोलिसांत तक्रार दिली़ त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला.अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी १ ते ९ आॅगस्टपर्यंत शहरातील तीन शासकीय गोदामांची तपासणी केली. (प्रतिनिधी)
परभणीत पाच कोटींचा धान्य घोटाळा
By admin | Published: August 14, 2016 1:29 AM