ऑनलाइन लोकमत
परभणी दि . 5 - परभणी ते मिरखेल या १७ कि.मी. अंतराच्या दुहेरीकरणाचे काम अंतिम टप्प्पात असून, येत्या एक-दोन दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
परभणी ते मुदखेड या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून, या अंतर्गत पहिल्या टप्प्यात परभणी ते मिरखेलपर्यंत रेल्वे मार्ग दुहेरीकरण कामास वर्षभरापूर्वी सुरूवात झाली होती. या संपूर्ण मार्गावर रेल्वे रुळ अंथरुन पूर्ण झाले असून, या मार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शेवटच्या टप्प्यात करावयाचे सिग्नल यंत्रणेचे काम सध्या सुरू आहे. नव्याने टाकलेल्या रेल्वे मार्गावर सध्या सिग्नल बसविले जात आहेत. मार्गाच्या दोन्ही बाजूला इलेक्ट्रॉनिक सिग्नल बसविण्यात येत असल्याने जुने सिग्नलही बंद पडले आहेत. त्यामुळे मिरखेलपर्यंत सर्व रेल्वे गाड्यांना मॅन्युअली सिग्नल देऊन पुढे पाठविले जात आहे. परिणामी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. दोन दिवसांपासून सिग्नल बसविण्याचे काम सुरू असल्याने ५ जून रोजी रेल्वे प्रशासनाने मिरखेल ते परभणी या रेल्वे मार्गावरुन धावणाºया जवळपास पाच रेल्वे गाड्या पूर्णत: रद्द केल्या असून, काही रेल्वे गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
परभणी ते मिरखेलपर्यंतच्या दुहेरीकरणाचे काम एक-दोन दिवसांपूर्ण झाल्यानंतर त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. रेल्वे बोर्डाच्या परवानगीनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.
मनमाडपर्यंत सर्वेक्षण पूर्ण-
परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गावर दुहेरीकरण करण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल एक महिन्यापूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला असून, बोर्डाच्या निर्णयानंतरच हे काम सुरू होणार आहे.
या रेल्वे गाड्या झाल्या रद्द-
परभणी ते मिरखेल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने ५ जून रोजी काही रेल्वे गाड्या रद्द झाल्या. तर काही रेल्वे गाड्यांना अंशत: रद्द करण्यात आले आहे. त्यात पंढरपूर- निजामाबाद ही गाडी अंशत: रद्द करण्यात आली आहे. नांदेड- निजामाबाद, नांदेड- मनमाड, दौंड- नांदेड या गाड्या रद्द करण्यात आल्या. पुणे- निजामाबाद, अकोला-परळी, पूर्णा- आदिलाबाद या गाड्या अंशत: रद्द केल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.