परभणी: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३८ हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठे भगदाड पडल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे पक्षातील डॅमेज कंट्रोल करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अधिक सक्रीय झाले असून, बंडखोरांविरोधात कारवाईचे सत्र सुरू करण्यात आले आहेत. तसेच जे मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत, अशा नेत्यांकडे पत्र व्यवहार सुरू करण्यात आला आहे. असेच एक पत्र उद्धव ठाकरे यांनी एका एकनिष्ठ आमदाराला लिहिले असून, यावर, उद्धव ठाकरे यांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले, अशी भावूक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.
स्थानिक आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे शिवसेनेसह ठाकरे घराण्यावरील एकनिष्ठता दाखवून दिली. विशेषतः पक्षप्रमुख ठाकरे यांनी पाठविलेल्या पत्रातून कौतूकाची थाप दिली. या पत्राने आमदार पाटील हे अक्षरशः भारावले. पाटील यांनीही पक्षप्रमुख ठाकरे यांना पत्र पाठवून आपणास या पत्राने शंभर हत्तीचे बळ मिळाले असल्याची माहिती दिली आहे.
शिवसेना परिवारास अघोरी दृष्ट
शिवसेना आपला परिवार आहे. या परिवारास अघोरी दृष्ट लागली. आपण मुख्यमंत्रीपद स्वाभिमानाने सोडले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी विचारांची ढाल म्हणजेच शिवसेना आहे. आपल्या उमेदीच्या वयातच या विचाराने आम्ही तेजाळून गेलो आहोत. त्यामुळे आणखी कुठलीही अपेक्षा नाही. शिवसेनेची निष्ठा हेच आमचे सर्वस्व आहे. या लढाईत आपण स्वतः काळजी घ्यावी. परभणी जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्ता आपल्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे, असेही आमदार राहुल पाटील यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी काय लिहिले होते पत्रात?
जय महाराष्ट्र! शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहे. निष्ठा व अस्मितेची महती हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीच आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक असल्याचे दाखवून दिलेत. कोणत्याही धमक्या वा प्रलोभनाला बळी न पडता आपण निष्ठेने शिवसेनेसोबत राहिलात, आपल्या या भूमिकेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला व शिवसेनेस बळ मिळाले, असे उद्धव ठाकरे यांनी आमदार पाटील यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते.