परभणी : खेळपट्टीवर शतके ठोकणाऱ्या क्रिकेटपटूंना आपण डोक्यावर घेतो़ परंतु शेकडो वर्षे शेतात नांगरण्याची शतके काढणा-या बळीराजाच्या कष्टाची दखल घेतली जात नाही़ प्रत्यक्षात अन्नधान्यामध्ये राज्याला स्वावलंबी बनविणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदनेशी नाते जोडणाऱ्या पत्रकारितेचीच आज गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी रविवारी येथे केले़हेमराजजी जैन प्रतिष्ठानच्या वतीने परभणी येथे शारदा महाविद्यालयाच्या प्रांगणात ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार भावे यांना ‘जैन बंधू पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़ या वेळी ते बोलत होते़ मंचावर संस्था सचिव हेमराजजी जैन, कवी इंद्रजित भालेराव, प्रतिष्ठानचे सचिव अनिल जैन, प्राचार्य एम़ टी़ मुलगीर यांची प्रमुख उपस्थिती होती़ या वेळी बोलताना भावे म्हणाले, की समाजात ९९ टक्के माणसे चांगली आहेत़ त्याच्या चांगुलपणाचा शोध घेतला पाहिजे़ त्यांना जागा दिली पाहिजे़ परंतु आज सर्वच क्षेत्रांसारखे पत्रकारितेसमोरही विश्वासार्हतेचे आव्हान आहे़ सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम आपले सत्व न हरवता पत्रकारांनी करावे, असेही भावे म्हणाले़ प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला़मराठवाडा, विदर्भात दुष्काळाची भीषण स्थिती आहे़ शेतकऱ्यांच्या आत्महत्या चटका लावणाऱ्या आहेत़ आज त्यांना सरकारच्या मदतीबरोबरच समाजाने मानसिक बळ देण्याची गरज असल्याचे लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा म्हणाले़ ज्येष्ठ पत्रकार भावे यांचा सन्मान करताना ते म्हणाले, दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दीर्घकालीन व तत्काळ मदतीच्या योजना राबविणे आवश्यक आहे़ त्याचवेळी समाजाने संवेदनशीलपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे़ याच भूमिकेतून सामान्य माणसांच्या प्रश्नांची जाण व भान ठेवणारी पत्रकारिता मधुकर भावे यांनी रुजवली़ जात, धर्म, प्रांताची अस्मिता टोकदार होत असलेल्या जमान्यात समाज एकसंघ ठेवणारे विचार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले़ कवी, लेखक, वक्ता, पत्रकार असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे़़ मुद्रित माध्यमाचे महत्त्व विषद करताना राजेंद्र दर्डा म्हणाले, वृत्तवाहिन्या व इंटरनेटच्या जमान्यातही मुद्रित माध्यम, वृत्तपत्रांचे स्थान अबाधित आहे़ घटनेमागील बातमी आणि विश्लेषणासाठी वृत्तपत्र पुढच्या काळातही असणार आहेत़ त्या माध्यमातून लोकशाहीचा चौथा स्तंभ अधिक बळकट करावा, असे सांगत त्यांनी सामाजिक सलोखा व पत्रकारांच्या भूमिकेवर भाष्य केले़ प्रास्ताविकात ज्येष्ठ पत्रकार हेमराजजी जैन यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली़ यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणाऱ्या ‘कापूस कोंड्याची गोष्ट’ या आॅस्करसाठी निवडलेल्या चित्रपटातील गीतांचे लेखन करणारे कवी इंद्रजित भालेराव यांचा विशेष सत्कार करण्यात आला़
परभणीत जैन बंधू पत्रकारिता पुरस्कार वितरणाचा शानदार सोहळा
By admin | Published: December 22, 2014 3:13 AM