घराण्यात काेणीच शिक्षित नाही, पण, शिक्षणाचे महत्त्व सगळ्यांनाच. त्यामुळे पाेरगं शिकतंय याचा अभिमान कुटुंबाला होता. त्यामुळे अल्पभूधारक शेतकरी असूनही पोराला काेणतीच गोष्ट कमी पडू दिली नाही. पोरानेही आई-वडिलांचे कष्ट लक्षात ठेवले. सात-सात तास सलग अभ्यास करताना आपणाला काय बनायचे आहे, ही दिशा स्पष्ट केली. त्याच दिशेने जाताना कुटुंबाची पार्श्वभूमी, आई-वडिलांचे कष्ट तो कधीच विसरला नाही... त्याचा हाच विश्वास, आत्मविश्वास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेत राज्यात प्रथम येण्यापर्यंत घेऊन गेला. विनायक पाटील या अवघ्या २३ वर्षांच्या तरुणाची ही गोष्ट... ना कुठला क्लास ना कुणाचं मार्गदर्शन... या यशाचा विनायक पाटील यांनी ‘लोकमत’चे कोल्हापूरचे प्रतिनिधी पोपट पवार यांच्याशी बोलताना उलगडा केला.
तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? कोल्हापूर जिल्ह्यातल्या मुदाळ (ता.भुदरगड) या चार हजार लोकवस्तीच्या गावातला मी पहिला क्लास वन अधिकारी. आई-वडील दोघेही शेतकरी, त्यांचे शिक्षणही अल्पच, घराण्यातही शिक्षणाचा गंध नाही. पण, मी ही परंपरा मोडीत काढली. गावातल्या प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर प. बा. पाटील विद्यालयात सेमी इंग्लिश मीडियममधून आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीत ९३ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळवला. याच विद्यालयातून विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण करताना पुन्हा ९३ टक्के गुणांसह प्रथम आलो. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी.एस्सी.ला प्रवेश घेतला. संख्याशास्त्रामधून पदवीचे शिक्षण सुरू असतानाच मला स्पर्धा परीक्षेची ओढ लागली. अधिकारी झालो तर समाजाच्या हिताचे करू शकू, ही भावना होती, शिवाय कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देणेही गरजेचे वाटल्याने पूर्ण क्षमतेने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.
स्पर्धा परीक्षेची तयारी कधी सुरू केली..? पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०२१ पासून कोल्हापुरातल्या सायबर चौकातील खासगी अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्यासाठी कुठेही शिकवणी लावली नाही. रोज सात तास अभ्यास, त्यात मात्र कधीही खंड पडू दिला नाही. यातून २०२२ मध्ये विक्रीकर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी या परीक्षांमध्ये यश मिळवले. पुढे पहिल्याच प्रयत्नात उपशिक्षणाधिकारी परीक्षाही उत्तीर्ण झालो. पण, यश डोक्यात जाऊ दिले नाही. जे बनायचे आहे ते साध्य करू, ही खूणगाठ मनाशी बांधत अभ्यास सुरू ठेवत २०२२ मध्ये राज्यसेवा परीक्षा दिली. याच परीक्षेत मी राज्यात प्रथम आलो. सध्या मी नागपूर येथे उपशिक्षणाधिकारीपदाचे प्रशिक्षण घेत आहे.
तुमच्या प्रवासात कुटुंबाचे पाठबळ कसे मिळत गेले?शिक्षणासाठी कुटुंबाकडून नेहमीच पाठबळ मिळत गेले. पदवी घेतल्यानंतर दोन वर्षांतच स्पर्धा परीक्षेत यश मिळवले. शिवाय पदवीचे शिक्षण घेताना इन्स्पायर व स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ‘सारथी’ची शिष्यवृत्ती मिळाल्याने कुटुंबावर तितकासा आर्थिक ताण आला नाही.
स्पर्धा परीक्षेच्यउमेदवारांना काय सांगाल? स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपल्यासाठी कुटुंबाने घेतलेले कष्ट डोळ्यासमोर ठेवाच; पण एकावेळी एकच परीक्षा समोर ठेवून त्यावर लक्ष केंद्रित केले तर यश दूर नाही. मात्र, प्रत्येकाने ‘प्लॅन बी’ही तयार ठेवणे गरजेचे आहे.