पुणे : शहरात पार्किंगची समस्या सर्वांत मोठी आहे. पालिकेने शहरातील पार्किंगसाठी दर आकारण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर या वाहनांना अधिकृत पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी काय तोडगा काढता येईल, यावर विचार होणे आवश्यक आहे, अशी भूमिका वाहतूक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी बुधवारी मुख्य सभेत मांडली.शहराच्या वाहतूक प्रश्नावर विशेष मुख्य सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला प्रवीण मुंढे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील वाहतुकीच्या समस्या मांडल्या. प्रभागातील विकासकामांना वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी यापुढे विलंब होणार नाही. जर त्याबाबत काही अडचण निर्माण झाली, तर नगरसेवकांनी थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे प्रवीण मुंढे यांनी सांगितले.विशाल तांबे म्हणाले, ‘‘वाहतूक समस्येला नेहमी पालिकेला जबाबदार धरले जाते. वाहतुकीच्या नियमांचे पालन व्हावे. रस्त्यावर बेकायदेशीरपणे पार्किंग होऊनही कारवाई होत नाही. जॅमर वाहतूक विभागाला उपलब्ध होत नाही. वॉर्डन योग्य काम करीत नाही.’’वनिता वागस्कर म्हणाल्या, ‘‘वाहतुकीमध्ये बदल करण्यापूर्वी स्थानिक लोकांना विश्वासात घेतले पाहिजे. नो पार्किंगच्या ठिकाणी लावलेल्या वाहनांवर कारवाई होत नाही. वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मागितल्यानंतर लवकर मिळत नाही.’’सुनंदा गडाळे म्हणाल्या, ‘‘पेठ भागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते. वाहतूक पोलिसांची संख्या कमी आहे. अतिक्रमणांवर कारवाई होत नाही.’’सुभाष जगताप म्हणाले, ‘‘पुढे २५ वर्षांनी काय होणार आहे, याचा विचार केला पाहिजे. वाहतुकीबाबत स्वतंत्र निधीची तरतूद करावी.’’रूपाली पाटील म्हणाल्या, ‘‘वाहतूक विभागाकडे गतिरोधक बसविण्यासाठी अर्ज करून वर्षानुवर्षे परवानगी मिळत नाही. वाहतूक विभागाच्या परवानग्या लवकर मिळाव्यात.’’ दत्तात्रय धनकवडे म्हणाले, ‘‘सातारा रस्त्यावर मोटारी पार्क होत असल्याने मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्याकडे पोलिसांनी लक्ष द्यावे.’’पार्किंगसाठी स्वत:ची जागा असल्याशिवाय वाहन खरेदी करता येऊ नये. मध्य भागात ७५ टक्के सिग्नल बंद असतात, ते चालू स्थितीत ठेवले जावेत आदी सूचना नगरसेविकांनी केल्या. मुक्ता टिळक, मनीषा घाटे, नंदा लोणकर, विजया वाडकर, अर्चना कांबळे, दिलीप काळोखे, संगीता ठोसर, अनिल टिंगरे, अस्मिता शिंदे, बाबू वागस्कर, अविनाश बागवे, विकास दांगट, सिद्धार्थ धेंडे, सचिन दोडके, धनंजय जाधव, सचिन भगत, आप्पा रेणुसे, महेंद्र पठारे यांनी प्रभागातल्या समस्या मांडल्या. >दिल्लीप्रमाणे पुण्यात सम-विषमचा प्रयोग व्हावादिल्लीमध्ये वाहनांच्या क्रमांकानुसार सम-विषमचा प्रयोग राबविण्यात आला. शेवटी सम क्रमांक येणाऱ्या वाहनांनी सम तारखेच्या दिवशी वाहन रस्त्यावर आणावे, तर शेवटी विषम संख्येचा क्रमांक येणाऱ्या वाहनांनी विषम संख्येच्या दिवशी वाहन रस्त्यावर आणावे, अशी ती योजना आहे. दिल्लीमध्ये त्याचा प्रयोग चांगल्या प्रकारे यशस्वी झाला. या पार्श्वभूमीवर पुण्यातही वाहनांसाठी सम-विषमचा प्रयोग राबविण्यात यावा, अशी सूचना महापालिकेचे सभागृह नेते शंकर ऊर्फ बंडू केमसे यांनी केली.>सिग्नल यंत्रणेसाठी २ इंजिनिअर द्यावेतशहरातील सिग्नल यंत्रणेचे तांत्रिक ज्ञान पोलिसांकडे नाही. ते चांगल्या प्रकारे कार्यान्वित राहावेत तसेच वाहतुकीचे योग्य प्रकारे नियोजन करता यावे, यासाठी पालिकेने वाहतूक विभागाला दोन इंजिनिअर द्यावेत, अशी मागणी प्रवीण मुंढे यांनी मुख्य सभेत महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे केली.
पालिकेने घ्यावे पार्किंग शुल्क
By admin | Published: September 22, 2016 1:49 AM