चेतन ननावरे, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - गिरणगावातील कामगार चळवळीच्या केंद्रबिंदूपैकी एक असलेले परळ येथील कामगार मैदान सध्या पार्किंग लॉट बनले आहे. गिरणगावात कामगार चळवळ जोरात असताना दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंपासून दत्ता सामंत यांपर्यंत अनेक दिग्गज नेत्यांच्या सभांनी हे मैदान गाजवले. पण सध्या या मैदानाची पुरती दूरवस्था झाली आहे.
खेळासाठीचे हे मैदान गाडया पार्क करण्यासाठी वापरण्यात येत आहे. केईएम रूग्णालयात रूग्णांना पाहण्यासाठी येणारे नातेवाईक आणि कॅनरा बँकमध्ये येणारे ग्राहक सर्रासपणे याठिकाणी गाड्या पार्क करतात. त्यामुळे खेळात व्यत्यय निर्माण होतोच, मात्र खेळ खेळण्यास जागाच शिल्लक राहत नाही आहे. त्यात गाडी पार्क करताना खेळांडूचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याप्रकरणात लक्ष घालण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
याशिवाय दरवर्षी या मैदानात नवरात्रौत्सव साजरा होतो. यावर्षी नवरात्रात पाऊस असल्यामुळे नवरात्रौत्सवातील मंडपाच्या सामनाचे ने-आण करणारे ट्रक आणि अन्य गाडयांची चाके चिखलात रुतून मैदानावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे मैदानाची समतल बिघडला असून चढ-उतार तयार झाले आहेत. परिणामी पहाटे आणि सायंकाळी मैदानात फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांची वाट बिकट झाल्याची माहिती मैदान वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिली आहे.
माजी खासदार मोहन रावले यांच्या खासदार निधीतून मैदानाच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपयांचा निधी देण्यात आला होता. मात्र त्यातून मैदानात पाणी मारण्याव्यतिरिक्त दुसरी यंत्रणा उभी राहू शकली नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत या ऐतिहासिक कामगार मैदानाचा मुद्दा राजकारणासाठी न वापरता, तो मार्गी लावण्याचे आवाहन स्थानिकांनी केले आहे.
छाया - दत्ता खेडेकर