- शीलेश शर्मा, नवी दिल्ली
दिल्ली सरकार लंडनचे हाईड पार्क आणि न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कच्या धर्तीवर देशाच्या राजधानीत चार उद्याने विकसित करणार आहे. त्यापासून प्रेरणा घेत महाराष्ट्रातील नागपूर, मुंबई व पुणे येथेही अशी उद्याने विकसित करावीत, अशी मागणी माजी खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. दिल्लीतील मोठी उद्याने आंतरराष्ट्रीय दर्जाची करण्यासाठी उपराज्यपाल नजीब जंग यांनी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, ही कंपनी पूर्णपणे स्वायत्त असेल. दिल्ली विकास प्राधिकरण आणि ही नवी कंपनी उद्यानांची योजना पूर्णत्वास नेणार आहे. विशेष म्हणजे ही कंपनी उद्याने विकसित करण्यासह त्यांच्या देखभालीची जबाबदारी सांभाळणार आहे. नवी दिल्लीत असा अनोखा प्रयोग होऊ शकतो, तर तो महाराष्ट्रात का होऊ शकत नाही, असे दर्डा यांना वाटते. त्याच तळमळीतून त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी केली. दिल्लीतील उद्यानांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याची कार्ययोजना तयार करण्यात आली असून, आकर्षक नैसर्गिक देखावे, वनस्पतीशास्त्र, वन्यजीव आणि जैवविविधतेचा त्यात अंतर्भाव आहे. या उद्यानांत चित्रपटगृह, मनोरंजन नगरी, कलाकृती आणि उपाहारगृहांसह इतर अनेक आकर्षणे असतील. दिल्लीतील उद्यानांना लंडन, अमेरिका, हाँगकाँग येथील उद्यानांप्रमाणे विकसित करण्यासाठी या क्षेत्रातील १५ तज्ज्ञांचा कंपनीच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्र दुष्काळासह पाण्याच्या भीषण टंचाईने होरपळून निघाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा विषय केवळ गांभीर्यानेच घेतला नाही, तर ‘जल शिवार’ योजना आणून एक नवा मार्ग शोधला. महाराष्ट्र हे देशाचे अग्रणी राज्य असल्यामुळे त्याने असे अनोखे प्रयोग करायला हवेत, असेही दर्डा यांनी म्हटले.महाराष्ट्रात प्रयोग करण्याची आवश्यकता- दिल्ली सरकार समृद्ध देशांच्या तोडीस तोड उद्याने विकसित करण्यासाठी झटून कामाला लागले आहे. उपराज्यपाल जंग यांनी याच आठवड्यात दिल्ली विकास प्राधिकरणाची बैठक घेऊन या योजनेवर तातडीने काम करण्याच्या सूचना दिल्या. - माजी खासदार दर्डा म्हणाले की, दिल्लीसारखे छोटे राज्य लंडन, हाँगकाँग आणि अमेरिकेची बरोबरी करण्यासाठी कंबर कसत असेल, तर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याला पुढे येऊन असे प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे मुख्यमंत्री तरुण आहेत ते याची निश्चितच दखल घेतील, अशी आशा आहे.