- यदू जोशीमुंबई - बीअरबार/परमिटरूममध्ये लवकरच दुकानाच्या दरात विदेशी दारूची बाटली मिळणार आहे. त्यामुळे बीअरबारमध्ये ग्राहकांची होणारी लूट थांबणार असून, सरकारच्या उत्पन्नात पाच हजार कोटी रुपयांची भर पडेल, असा अंदाज आहे. या शिवाय, विदेशी दारूवरील उत्पादन शुल्कातही वाढ करण्यात येणार आहे.१९७३ नंतर राज्य सरकारने एकाही नव्या विदेशी दारूविक्री दुकानाला परवाना दिलेला नाही. आता हे परवाने खुले केले आणि त्यांचे वाटप केले तर सरकार दारूबंदीऐवजी दारूचा महापूर आणत असल्याची टीका होऊ शकते. ही टीका टाळतानाच राज्याच्या उत्पादन शुल्कातही वाढ व्हावी, यासाठी आता परमिटरूममध्ये विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या विकण्याची परवानगी देण्यात येणार आहे. उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला.बार/परमिटरूममध्ये जाऊन दारू पिण्यासाठी बसणाºयांना ‘पेग सिस्टीम’ने दारू प्यावी लागते आणि त्यापोटी बाटलीच्या मूळ किमतीच्या तिप्पट, चौपट पैसे मोजावे लागतात. शिवाय जवळपास दारूचे दुकानच नसेल तर ग्राहकाला परमिटरूमममध्ये जाऊन दारू पिण्याशिवाय पर्याय नसतो. अशा वेळी त्याच्या खिशावर अधिक भार पडतो.मात्र आता सरकारच्या नव्या निर्णयामुळे दारू दुकानाप्रमाणेच परमिटरूममध्ये जाऊन दारूची बाटली ग्राहकांना खरेदी करता येणार आहे, ती त्यांना बाहेर नेऊन प्यावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.बार/परमिटरूमसाठी एफएल ३ हा परवाना दिला जातो. त्यांनाचआता एफएल २चा (दारू दुकानाचा) परवानाही दिला जाणार आहेआणि त्यापोटी निश्चित असे शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कामुळे आणि बार/परमिटरूममध्येबाटली उपलब्ध झाल्याने त्यांची विक्री वाढेल आणि जवळपास पाच हजार कोटी रुपयांचे उत्पादन शुल्क मिळू शकेल, असा अंदाजदेखील वर्तवण्यात येत आहे.बीअरबारमध्ये बाहेर नेण्यासाठी बाटलीची विक्री व्हावी, ही मद्यपींची खूप वर्षांपासूनची मागणी आहे. त्यांची ही जुनी मागणी यानिमित्ताने का होईना; पण आता पूर्ण होणार आहे. मुळात देशी दारूच्या दुकानांत बीअर आणि विदेशी दारूची परवानगी देण्याचा आधीचाच प्रस्ताव आहे; पण त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही.लवकरच निर्णयविदेशी दारूवरील उत्पादन शुल्कात १० ते १२ टक्के इतकी वाढ करण्याचा उत्पादन शुल्क विभागाचा प्रस्ताव आहे. या आधीची वाढ २०११मध्ये केली होती. आता सात वर्षांनंतर वाढ प्रस्तावित केली आहे. त्यामुळे राज्यात विदेशी दारूची किंमत वाढणार आहे. उत्पादन किमतीच्या ३०० टक्के इतके उत्पादन शुल्क सध्या आकारले जाते. विभागाने दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. सरकार त्याबाबत लवकरच निर्णय घेईल, असे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले.मद्यपींच्या खिशाला कात्रीविदेशी दारूवरील उत्पादन शुल्कात वाढ केल्यास शेजारील राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील विदेशी दारू अधिक महाग होण्याची शक्यता आहे. तसे झाले तर परराज्यातून छुप्या मार्गाने दारू येण्याचे प्रमाण वाढण्याचीही शक्यता आहे. त्याच वेळी सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ होईल आणि मद्यपींच्या खिशाला अधिक कात्री लागेल.
परमिटरूमध्येही दुकानाच्या दरात ‘पार्सल’!, सरकारी उत्पन्नात पाच हजार कोटींची वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 4:50 AM