अहमदनगर : पारनेर नगरपंचायतीवर सर्वाधिक ७ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी मिळवली तर कर्जत नगरपंचायतीमध्येही राष्ट्रवादी कॉंग्रेसने १२ जागांवर आघाडी घेत वर्चस्व मिळवले आहे. अकोले नगरपंचायतीमध्ये मात्र माजी मंत्री मधुकर पिचड यांनी वर्चस्व राखले असून तिथे भाजप १२ जागांवर आघाडीवर आहे.
जिल्ह्यातील अकोले, कर्जत आणि पारनेर नगरपंचायतीसाठी मंगळवारी मतदान झाले होते. खुल्या जागांवरील मतदान एक महिन्यापूर्वी तर ओबिसी आरक्षण रद्द झाल्याने तिथे उर्वरीत जागांवर मंगळवारी मतदान झाले होते. त्यामुळे सर्व जागांसाठीची मतमोजणी आज सकाळी सुरू झाली.
पारनेर नगरपंचायतीमध्ये १७ जागांपैकी राष्ट्रवादी ७, शिवसेना ६, अपक्ष १, शहर आघाडी २ आणि भाजपा १ जागांवर आघाडीवर आहे. तिथे आमदार निलेश लंके यांचेच वर्चस्व स्थापीत झाले आहे. माजी सभापती जयश्री विजय औटी, स्वाती निलेश खोदडे या उमेदवारांना परभावचा धक्का बसला.
कर्जत नगर पंचायतीमध्येही आमदार रोहित पवार यांचाच करिष्मा चालला. तिथे राष्ट्रवादीचे १२ जागांवर, कॉंग्रेसचे ३ आणि भाजप २ जागांवर आघाडीवर आहे. तिथे राष्ट्रवादीचेच निर्विवाद बहुमत झाले आहे.
अकोलेत मात्र भाजपने मुसंडी मारली आहे. तिथे माजी मंत्री मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड हे सध्या भाजपात आहेत. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली भाजपने १२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तिथे राष्ट्रवादी २, कॉंग्रेस १ आणि शिवसेना २ जागांवर आघाडीवर आहे.