पणजी : गोव्यात काँग्रेसपेक्षा कमी जागा मिळालेल्या असताना भाजपाने बाजी मारली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व गोवा प्रभारी नितीन गडकरी व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर दिल्लीतून गोव्यात आले. इतर पक्षांशी संपर्क साधत त्यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला, काँग्रेस मात्र नेतानिवडीतच अडकली.भाजपाप्रणित आघाडीचे २१ आमदार राज्यपालांकडे गेले, सरकार स्थापनेचा दावा केला. मात्र काँग्रेसमधील काथ्याकूट सुरूच होता. त्यांचा नेता काही ठरेना तेव्हा गोवा प्रभारी दिग्विजय सिंह आणि चेल्लाकुमार यांनी नेता निवडीसाठी गुप्त मतदान घेतले. गंमतीचा भाग म्हणजे हा नेता म्हणजे विरोधी पक्षनेता, अशी शेरेबाजीही सोशल मीडियावर सुरू झाली.काँग्रेसचे १७ आमदार एका हॉटेलमध्ये होते. तेथेच दिग्विजय सिंह आणि चेल्लाकुमार यांनीही मुक्काम केला. त्यांनी नेता निवडीसाठी सर्व आमदारांशी चर्चा केली. काँग्रेस विधिमंडळ नेता तथा मुख्यमंत्रिपदाचा दावेदारच ठरत नसल्याने शेवटी सिंह यांनी गुप्त मतदान घेतले. मात्र, त्याचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच भाजपाने मगोप, गोवा फॉरवर्ड आणि अपक्षांसह २१ आमदारांना घेऊन राजभवन गाठले आणि काँग्रेसची स्वप्ने धुळीस मिळाली. अर्थात या सगळ््यास जबाबदार ठरली ती काँग्रेसमधील अनास्था आणि मुख्यमंत्रिदासाठी तीन नेत्यांमधील स्पर्धा. मगोप भाजपालाच पाठिंबा देईल हे उघड होतेच; पण विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षानेही भाजपाप्रणित आघाडीलाच पाठिंबा देऊन मनोहर पर्रीकर यांचे नेतृत्व स्वीकारावे, असे ठरविले. काँग्रेसचे नेते लुईझिन फालेरो हे मुख्यमंत्रिपदावर दावा करून बसले होते. गोवा फॉरवर्डला फालेरो यांचे नेतृत्व नकोच. दिगंबर कामत किंवा राणे यांना मुख्यमंत्री बनवू, अशा प्रकारची काँग्रेसच्या आमदारांमध्ये चर्चा होती. दिवसभर आमदार अस्वस्थपणे हॉटेलमध्ये फिरत होते. लवकर एकदा गोवा फॉरवर्ड व अपक्ष आमदार रोहन खंवटे यांचा पाठिंबा घ्या, असे आमदार सुचवत होते; पण काँग्रेसचा विधिमंडळ नेता कोण हेच ठरेना. शेवटी रोहन खंवटेही कंटाळले व त्यांनीही पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाप्रणित आघाडीचा पर्याय निवडला. (खास प्रतिनिधी)
पर्रीकरांनी मारली बाजी, काँग्रेसची नेतानिवडच नाही!
By admin | Published: March 13, 2017 4:02 AM