सद्गुरू पाटील, पणजीमनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात नव्या सरकारचा शपथविधी मंगळवारी, सायंकाळी सव्वापाच वाजता काबो येथील राजनिवासावर होणार आहे. पर्रीकर चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. मुख्यमंत्र्यांसह एकूण नऊ मंत्र्यांचा मंगळवारी शपथविधी होणार आहे. तथापि, भाजपाकडे केवळ १३ आमदार असताना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला निमंत्रित केल्यामुळे गोवा सुरक्षा मंच पक्षाने राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. भाजपाप्रणीत आघाडीकडे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष तीन मिळून एकूण २२ आमदारांचे संख्याबळ आहे.पर्रीकर यांनी सोमवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि नंतर पणजीहूनच संरक्षणमंत्रीपदाचा राजीनामा दिल्लीत पंतप्रधानांच्या कार्यालयास पाठवला. पर्रीकर २००० साली प्रथम मुख्यमंत्री बनले होते. यापूर्वी तीनवेळा मुख्यमंत्री बनलेल्या पर्रीकर यांनी एकदाही मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही. आता चौथ्यांदा पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्री म्हणून मगोपचे सुदिन ढवळीकर व बाबू आजगावकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि अपक्ष रोहन खंवटे व अपक्ष आमदार गोविंद गावडे यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. या शिवाय भाजपाच्या दोघा आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. मुख्यमंत्र्यांसह एकूण बाराजणांना मंत्री करता येते. नऊजणांना शपथ देऊन मंत्रिमंडळातील तीन पदे तूर्त रिकामी ठेवली जाणार आहेत. सरदेसाई, खंवटे, गावडे, साळगावकर हे प्रथमच मंत्री बनत आहेत.दरम्यान, पर्रीकर व भाजपने गोव्यात अतिशय अनैतिक पद्धतीने सत्ता प्राप्त केली आहे. गोव्यात मध्यावधी निवडणुका येतील. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी केलेली घाई संशयास्पद आहे, अशी टीका गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.....................काँग्रेसचा अखेरचा प्रयत्न४0 सदस्यीय गोवा विधानसभेत विरोधी काँग्रेसकडे एकूण १७ आमदारांचे संख्याबळ आहे. २०१२ साली काँग्रेसचे केवळ नऊच उमेदवार निवडून आले होते. यावेळी १७ पर्यंत मजल गेल्याने सरकार बनवायचे असे काँग्रेसने ठरविले होते. तथापि, आपला नेता निवडण्याबाबत व अन्य पक्षांचा पाठिंबा मिळविण्याबाबत काँग्रेसने विलंब केला. यामुळे काँग्रेसला पुन्हा विरोधातच बसावे लागणार आहे. १७ आमदार जिंकून येऊनदेखील पुन्हा विरोधात बसावे लागणार असल्याने काँग्रेसचे काही आमदार अतिशय अस्वस्थ आहेत. नवे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी काँग्रेसच्या सर्व आमदारांची बैठक झाली. कवळेकर यांनी तेव्हा सर्वांनी संघटित राहावे, परिस्थिती बदलेल, कारण पर्रीकर यांच्याकडे स्पष्ट बहुमत नाही, असे आपल्या आमदारांना सांगितले. काँग्रेसचे एक आमदार विश्वजित राणे यांनी कंटाळून राजीनामा दिल्याची चर्चा पसरली होती. तथापि, आपण कुठेच गेलेलो नसून आपण काँग्रेसमध्येच आहोत, केवळ अफवा पसरविल्या जात असल्याचे विश्वजित यांनी ‘लोकमत’ला सांगितले.निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयातभाजपा नेते मनोहर पर्रीकर यांना गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नेमण्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या निर्णयाला काँग्रेसने सोमवारी सायंकाळी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. पर्रीकरांच्या शपथविधीला स्थगिती द्यावी आणि पर्रीकरांना मुख्यमंत्रीपदी नेमण्याचा राज्यपालांचा निर्णय रद्द करावा, अशी काँग्रेसची मागणी आहे. मंगळवारी याचिकेवर सुनावणी होईल.जेटलींकडे कार्यभार संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे आता संरक्षणमंत्रीपदी कोण यावरून तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
पर्रीकरांचा आज शपथविधी
By admin | Published: March 14, 2017 7:47 AM