रोहित पवार यांच्यापाठोपाठ पार्थही स्थानिक प्रश्नांवर सक्रिय !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 01:32 PM2019-07-23T13:32:58+5:302019-07-23T13:34:06+5:30
अजित पवार यांनी देखील विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय पार्थवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून तरी त्यांना विधानसभा लढविण्यासाठी 'ग्रीन सिग्नल' असल्याचे दिसून येते. त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात पार्थ दिसल्यास नवल वाटायला नको.
मुंबई - लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाचा पवार कुटुंबियांना धक्का बसला हे नक्की. पवार कुटुंबियांतील अद्याप कोणालाही पराभव पाहावा लागला नसून पार्थ पवारांच्या वाट्याला हे दु:ख आले. तरी देखील पार्थ पराभवानंतरही राजकारणात आणखी सक्रिय होताना दिसत आहेत. मात्र विधानसभेच्या तयारीसाठी तर ते सक्रिय झाले नाही ना, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीत पूर्वतयारी न करताच पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. पहिल्या भाषणावरूनच पार्थ पवार ट्रोल झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांची पाठराखण केली. परंतु, लोकसभेसाठी हवी असलेली तयारी पार्थ यांची झालीच नव्हती, हे निकालानंतर स्पष्ट झाले. याउलट पवार कुटुंबातून राजकारणात येऊ पाहणारे रोहित पवार पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरले आहे.
रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा गड असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघातून काम सुरू केले. लोकांमध्ये जावून ते स्थानिकांच्या अडचणी समजून घेत आहेत. आता पार्थ पवार देखील त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत आहेत. पार्थ यांनी पिंपरी चिंचवड येथे स्वच्छता मोहिम राबविली. कचऱ्याच्या समस्येवर पार्थ पवार यांनी येथील सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला. यावेळी राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते.
स्थानिकांचे प्रश्न घेऊन पार्थ पवार पहिल्यांदाच रस्त्यावर उतरले. येथील जुन्या मंडईत पार्थ यांनी स्वच्छता केली. तसेच पुढील १५ दिवसांत शहर कचरा आणि दुर्गंधीमुक्त झाले पाहिजे असा अल्टिमेटम पालिकेतील सत्ताधारी भाजपला दिला. मात्र पार्थ यांची ही तयारी विधानसभेसाठी तर नव्हे असा प्रश्न उपस्थित होत आहे. अजित पवार यांनी देखील विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भातील निर्णय पार्थवर अवलंबून असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कुटुंबियांकडून तरी त्यांना विधानसभा लढविण्यासाठी 'ग्रीन सिग्नल' असल्याचे दिसून येते. त्यामुळे विधानसभेच्या रिंगणात पार्थ दिसल्यास नवल वाटायला नको.