पिंपरी-चिंचवड : मावळ लोकसभा मतदारसंघात अनेक प्रयोग करूनही राष्ट्रवादी कॉँग्रेसला यश मिळत नसल्याने आता राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपला मुलगा पार्थ याला येथून लढविण्याची तयारी केली असल्याची चर्चा आहे. याबाबत पक्षाकडून अधिकृत सांगितले नसले तरी ‘हल्लीची पिढी स्वत:चे निर्णय स्वत:च घेते’ असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन राजकारणात प्रवेश केला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा पार्थ मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात आली आहे. अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून दीड वर्षापूर्वी राजकारण प्रवेश केला. त्याचबरोबर आता पार्थ यानेही लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून राजकारण प्रवेशाची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे.
या विषयी एक वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार म्हणाले, ‘राजकारणात प्रवेश करण्याविषयी माझे पार्थशी बोलणे झालेले नाही. परंतु, हल्लीची पिढी स्वत:चे निर्णय स्वत: घेते,’ असे सूचक विधान त्यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ, कर्जत, उरण, पनवेल विधानसभा मतदारसंघ आहेत. या ठिकाणी पूर्वी राष्ट्रवादी व शिवसेनेची ताकत होती. मात्र, राष्ट्रवादीतील विभाजनाचा फायदा घेत शिवसेनेने या मतदार संघात आतापर्यंत वर्चस्व राखले आहे. शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांनी २००९ व विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी २०१४ च्या निवडणुकीत बाजी मारली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. मावळच्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या भागातून राष्ट्रवादीचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे इच्छुक आहेत. आता अचानकपणे पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अजित पवार यांनी सोमवारी पिंपरी येथे घेतलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूक तयारीच्या बैठकीत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.