मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांचे यांचे नातू आणि अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे पार्थ पवार आता विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावण्याची शक्यता आहे. खुद्द अजित पवार यांनीच या संदर्भात सूचक इशारा दिला आहे.
शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार यांनी आधीच कर्जत जामखेड मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्यात पार्थ पवार यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास आमदारकीला पवार कुटुंबातील तीन उमेदवार राहण्याची शक्यता आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदार संघातून आमदार आहेत.
लोकसभा निवडणुकीत पार्थ यांचा पराभव झाल्यानंतर ते आता विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये होती. यावर आता खुद्द अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विधानसभा निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय पार्थ स्वत: घेईल, असं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
याआधी लोकसभा निवडणुकीच्या वेळी पार्थ यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीकडून घराणेशाहीला खतपाणी घालण्यात येत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यावेळी पार्थ यांना उमेदवारी देण्याची मागणी मावळ मतदार संघातून झाल्यानेच त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले होते. परंतु, विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय पार्थ ठरवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.