शिक्रापूर (जि. पुणे) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव व मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार पार्थ पवार यांच्या गाडीचा चालक मनोज ज्योतीराम सातपुते याचे मुंबईतून अपहरण करण्यात आले आहे. त्याला (सुपा, ता. पारनेर, जि. नगर) येथे बेशुद्धावस्थेत सोडून देण्यात आले.
अपहरणकर्त्यांनी 'तु पार्थ पवारांचा ड्रायव्हर का? ' असे म्हणून अपहरण केल्याने कुलाबा (मुंबई) व शिक्रापूर (जि. पुणे) पोलीसही चक्रावले असून, या प्रकरणी स्वत: पार्थ पवार या घटनेच्या खोलात जावून माहिती घेण्यासाठी मुंबई व पुणे जिल्हा पोलिसांच्या संपर्कात आहेत.
याबाबत चालक मनोज सातपुते ( वय २६, रा. सणसवाडी, ता. शिरूर, जि. पुणे) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, शुक्रवारी दि. ५ रोजी रात्री ८ वाजता मुंबईत कुलाबा बेस्ट डेपोजवळ उभा असताना एक लाल रंगाची ओमनी गाडी आली व तू पार्थ पवारांच्या गाडीचा चालक आहेस का? आम्हाला त्यांना भेटायचे आहे, असे म्हणून त्याला गाडीच्या पुढच्या सिटवर बसविले.
मात्र, त्यापुढील काहीच आठवत नाही, असे सांगून सातपुते यांना शरिरावर काही ठिकाणी मारहाण करून थेट सुपे येथे ६ रोजी सकाळी ८ वाजता सोडल्याचे आठवत असल्याचे पोलिसांना लिहून दिले आहे.
कुलाबा पोलीस करणार तपाससातपुते यांचा मोबाईलही गहाळ झाला असून,एसटीने सणसवाडी येथे येऊन खासगी रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांनी शिक्रापूर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञातांवर अपहरण, मारहाणीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, गुन्हा कुलाबा पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिली.