पुणे - पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत सातत्याने चर्चा होत असते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह गुंड गजा मारणेच्या घरी भेट दिली. त्यावरून शरद पवार गटानं निशाणा साधला आहे. मनी, मसल आणि पॉवर हे भाजपाचे सूत्र आता अजित पवार मित्र मंडळानेही अवलंबलं आहे का असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी विचारला आहे.
प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले की, आज पुण्यात गुन्हेगारी जगतात आनंदाचे वातावरण असते. ज्या ज्यावेळी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतात तेव्हा राज्यात गुन्हेगारी क्षेत्रात आनंद असतो. त्याचप्रमाणे आज राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पुणे शहर पदाधिकाऱ्यांसोबत गुंड गजा मारणेच्या घरी जाऊन भेट दिली. तिथे चहापाणी करत गुंडाची प्रतिष्ठा वाढवली. अजित पवार मित्र मंडळाचे पदाधिकारी पार्थ पवार यांनी गजा मारणेची भेट घेऊन ज्यारितीने राजकारणात मनी, मसल आणि पॉवर हे भाजपाचे सूत्र आहे तसे अजित पवारांचेही सूत्र आहे का असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तसेच एकेकाळी पुणे शहरातील कोयता गँगबाबत अजित पवारांनी विधानसभेत आवाज उठवला होता. कोयता गँगचे पुण्यात खूप मोठे प्रस्थ आहे. अशाप्रकारे आवाज उठवला असताना आता पुण्यातील एका गुंडाच्या घरी पार्थ पवार त्यांच्या पदाधिकाऱ्यासोबत जातात. गुंड आणि भ्रष्ट यांची प्रतिष्ठा वाढवण्याचे काम सरकार आणि सरकारमधील लोक करत आहेत. हा लोकशाहीला, राजकारणाला कलंक आहे. राजकारणात तत्वे, नितिमत्ता गुंडाळून महाराष्ट्रात जे सुरू आहे त्याचा आम्ही निषेध करतो. अजित पवार आता गुंड गजा मारणेसोबत कधी फोटो काढतात आणि त्याला गाडीत घेऊन फिरतात हेच आम्हाला बघायचे आहे असा टोलाही विकास लवांडे यांनी अजित पवारांना लगावला आहे.
कोण आहे गजा मारणे?मुळशी तालुक्यातील गजानन मारणे उर्फ गजा मारणे हा पुणे शहरातील कुख्यात गुंड आहे. गुन्हेगारी क्षेत्रात गजा मारणेवर खंडणी, हत्या, मारामारी यासारख्या असंख्य गुन्ह्यांची नोंद आहे. पुणे शहरात त्याच्याविरोधात गंभीर गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये एका हत्येप्रकरणी गजा मारणेवर कारवाई करण्यात आली होती. नवी मुंबईतील तळोजा जेलमधून सुटका झाल्यावर गजा मारणेच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. मुंबई ते पुणे हजारो गाड्यांच्या ताफ्यात गजा मारणेची रॅली काढण्यात आली. त्यावेळी गजा मारणे प्रसिद्धीझोतात आला.