- वैभव गायकरपनवेल विधानसभा मतदारसंघपनवेल - मावळ लोकसभा मतदार संघातील पनवेल विधानसभा मतदार क्षेत्र हा सहा विधानसभा मतदार संघातील सर्वात मोठा मतदार संघ आहे. मावळ लोकसभा मतदार संघ हा घाटमाथा आणि कोकण या दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक वारसा असलेला मतदार संघ आहे. २००८ साली या मतदार संघाची नव्याने रचना करण्यात आली आहे. त्यानंतर २००९ आणि २०१४ मध्ये भाजपाच्या मदतीने सेनेचे गजानन बाबर आणि श्रीरंग बारणे हे खासदार याठिकाणाहून निवडून आले आहेत.पनवेल विधानसभा मतदार संघावर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचे वर्चस्व राहिले आहे. सलग दोन वेळा रामशेठ ठाकूर यांचे पुत्र प्रशांत ठाकूर आमदार म्हणून निवडून आले आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मतदार संघात विमानतळ कार्यान्वित होणार असल्याने भविष्यात नोकरीची संधी सर्वात जास्त आहे. सिडको प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या व समस्या हा मतदारसंघातील प्रमुख विषय राहिला आहे. मेट्रो ट्रेन, विमानतळ, सेंट्रल पार्कसारखे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उद्यान, गोल्फ कोर्स, पनवेल टर्मिनस हे बहुउद्देशीय प्रकल्प लक्षात घेता भविष्यातसर्वात चर्चिला जाणारा हा मतदार संघ आहे.२००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस विरूद्ध सेना अशी लढत याठिकाणी रंगली होती. राष्ट्रवादीतर्फे आझम पानसरेंना २ लाख ८४ हजार मते पडली होती तर गजानन बाबर यांना ३ लाख ६४ हजार विक्र मी मते पडली होती. २०१४ मध्ये या मतदार संघात शेकाप, सेना आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत झाली होती. या लढतीत बारणे यांनी बाजी मारली होती.भाजपाच्या ताब्यात हा मतदार संघ आहे. विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांची ही दुसरी टर्म आहे. पहिल्या टर्ममध्ये ते काँग्रेसच्या माध्यमातून निवडून आले होते. मात्र खारघर टोलच्या विषयावरून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपामधून दुसऱ्यांदा ठाकूर विधानसभेवर विराजमान झाले. या मतदार संघात शेकाप हा दुसऱ्या क्र मांकाचा पक्ष आहे. ग्रामीण भागात शेकापची पक्ष बांधणी चांगली आहे. मागील निवडणुकीतही शेकापच्या उमेदवाराला पनवेलमधून चांगली मते मिळाली होती.या मतदार संघात माजी आमदार विवेक पाटील, आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा देखील प्रभाव आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पुत्र पार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पवार कुटुंबीयांच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक मानली जात आहे.महत्त्वाच्या घडामोडी - २0१६ साली पनवेल महानगर पालिकेची स्थापना. पालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता.पनवेल शहरातील पाण्याची समस्या गंभीर आहे. यासंदर्भात सामाजिक संघटना तसेच राजकीय पक्षांनी पालिकेवर मोर्चे काढले होते. सेनेने देखील भाजपाच्या ताब्यात असलेल्या पालिकेवर मोर्चा काढला होता. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे देखील या मोर्चात सहभागी झाले होते.
पार्थ पवारच्या उमेदवारीने राजकीय घडामोडींना वेग, पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 4:49 AM