बारामती : पक्षाकडे विविध कार्यकर्ते उमेदवारी मागतात. उमेदवारीसाठी आग्रहदेखील धरतात. वेगवेगळ्या मतदारसंघांतून कार्यकर्त्यांची वेगवेगळी मागणी होत असते. त्याचप्रमाणे मावळमध्येदेखील कार्यकर्त्यांनी विशेषत: शेतकरी कामगार पक्षाच्या जयंत पाटलांनी ‘पार्थ’ला उमेदवारी दिल्यास मताधिक्य देण्याचे राष्ट्रवादीच्या वरिष्ठांना सांगितले होते. त्यामुळे पक्षाने विचार करूनच पार्थला उमेदवारी दिल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर पवार यांनी पार्थ पवार यांना दिलेल्या उमेदवारीबाबत भूमिका मांडली. यावेळी पवार म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्र पक्षांचे लोकसभा निवडणुकीचे जागा वाटप झाल्यानंतर मावळ मतदार संघातून उरण, पनवेल, कर्जत-खालापूर या भागातील विशेषत: शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंतराव पाटील व त्यांच्या असंख्य सहकारीमित्रांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठांची भेट घेतली. पार्थला उमेदवारी दिल्यास परिसरातून चांगल्या प्रकारचे मताधिक्य देवू असे सांगितले. मावळ लोकसभा मतदार संघ झाल्यापासून सुरूवातीला शिवसेनेचे गजानन बाबर खासदार झाले. त्यानंतर श्रीरंग बारणे खासदार झाले.मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाली. कारण आमचेच सहकारी लक्ष्मणराव जगताप शेकाप तून उभे राहिले. तर राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर उभे राहिले. अतिशय कमी वेळ मिळाला. हा मतदार संघ सर्वाधिक सुशिक्षितांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. राज्य सरकारच्या तिजोरीत सर्वाधिक कर देणारे पुणे व रायगड जिल्हा आहे,आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मतदारांची संख्या पिंपरी-चिंचवड, हिंजवडी, वाकड या भागात जास्त आहे.या मतदारांमध्ये उच्चशिक्षित,इंग्रजी चांगले समजणारा व बोलणारा उमेदवार हवा, अशी कार्यकर्त्यांची भावना होती. त्यामुळे पक्षाने विचार करून पार्थला उमेदवारी दिल्याचे पवार म्हणाले.सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची केव्हाही जागा सोडण्याची तयारी होती. याबाबत जयंत पाटील यांच्यासह आपण स्वत: सुजय यांच्याशी चर्चा देखील केली होती. हे चुकीचे असल्यास आपण म्हणेल ते ऐकन. मी जे बोलतो ते खरे बोलतो, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही कधीही जागा सोडण्यास तयार होतो. त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणार असते, तरी त्यांना उमेदवारी दिली असती. मात्र राष्ट्रवादीचे लोक त्यांचे काम करणार नाहीत. त्याचा मला त्रास होईल, असे सुजय यांनी आपणास सांगितल्याचे पवार म्हणाले.वाऱ्याची दिशा ओळखून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माघार घेतली, हा विरोधकांचा दावा राजकीय आहे. त्यांना राजकारण समजत नसावे. पवारसाहेब १४ वेळा निवडून आले आहेत. ते कोणत्याही मतदार संघातून निवडून येऊ शकतात. त्यांच्या नावावर आमच्यासारखे अनेकजण निवडून येतात. शिवाय ‘साहेबांचा’ राज्यसभेचा कार्यकाळ शिल्लक आहे,त्यांनी लोकसभा लढविली असती तर राज्यसेभेची जागा रिक्त झाली असती. त्यामुळे त्यांनी लोकसभेतून घेतलेल्या माघारी बाबत विरोधक राजकारणातून चुकीची वक्तव्य करत आहेत. घोड मैदान लांब नाही. राज्यातील ४८ जागांचे मे महिना अखेर चित्र स्पष्ट होईल, असे पवार म्हणाले. गेले दोन दिवस बाहेर असल्याने माढा मतदार संघातील उमेदवारीच्या निणर्याबाबत माहिती नाही. त्याबद्दल पवार साहेबांसह जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी वरिष्ठ नेते माढा मतदार संघातील प्रमुखांशी चर्चा करीत आहेत.
पक्षाने विचार करूनच दिली पार्थला उमेदवारी; अजित पवारांचं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 1:50 AM